
गायक होण्याचे स्वप्न पाहून उत्तराखंड येथून मुंबईत आलेल्या तरुणाला अखेर लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी शोधून काढले. सात वर्षांनंतर पोलिसांनी त्या दोन भावंडांची भेट घडवून आणली. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कंचन जोशी हा मूळचा उत्तराखंडचा रहिवाशी आहे. त्याला लहानपणापासून गायनाची प्रचंड आवड असल्याने गायक व्हायचे होते. गायक होऊन खूप पैसे कमवू हे स्वप्न पाहून तो सात वर्षांपूर्वी मुंबईत आला. कंचन घर सोडून गेल्याचे समजताच त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. अखेर नातेवाईकांनी उत्तराखंड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथील स्थानिक पोलिसांनी कंचन बेपत्ता असल्याप्रकरणी तक्रार दाखल करून तपास सुरू केला. सात वर्षं नातेवाईक हे कंचन कधीतरी घरी परत येईल या आशेवर होते. गेल्या वर्षी कंचनच्या आईला मोबाईलवर एक पह्न आला. तेव्हा कंचन हा मुंबईत असल्याचे सांगण्यात आले.
कंचन हा मुंबईत असल्याचे समजताच नातेवाईकांनी याची माहिती उत्तराखंड पोलिसांना कळवली. उत्तराखंड पोलिसांनी याची माहिती लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांना सांगितली. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई यांच्या पथकातील उपनिरीक्षक रुपाली कदम, बोऱहाडे, ढगे, खाडे, मखरे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांचे पथक नागपाडा येथे गेले. तेथे गेल्यावर पोलिसांनी एका हॉटेलच्या मालकाची चौकशी केली. चौकशी केल्यावर कंचनने 22 दिवस काम केल्यानंतर तो निघून गेल्याचे हॉटेलच्या मालकाने पोलिसांना सांगितले.
कंचनच्या शोधासाठी पोलिसांचे पथक माझगाव, रे रोड, भायखळा, हाजीअली परिसरात गेले. चार दिवस पोलीस आणि कंचनच्या नातेवाईकांनी तो परिसर अक्षरशः पिंजून काढला. त्याच दरम्यान कंचन हा माझगाव परिसरात फिरताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी कंचनला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. वरिष्ठ निरीक्षक ज्योती देसाई यांनी कंचनची चौकशी केली. चौकशीत त्याने आपल्याला गायक व्हायचे होते म्हणून मुंबईत आलो. मुंबईत आल्यावर आपली गायकी कळावी म्हणून यू-टय़ूबवर विडिओदेखील अपलोड केला होता, असे कंचनने देसाई यांना सांगितले. सात वर्षांनी भावाची भेट घडवून आणल्याने कंचनच्या भावाने पोलिसांचे आभार मानले.



























































