UP Election 2022 – असदुद्दीन ओवेसींच्या कारवर गोळीबार, वातावरण तापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. ओवेसी हे गुरुवारी हापुड येथील प्रचारसभा आटोपून दिल्लीला चालले होते. याचदरम्यान हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर चार ते पाच गोळ्या झाडल्या. सुदैवाने यात कुणाला दुखापत झाली नाही. पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार पळून गेला.

ओवेसी यांनी गुरुवारी हापुड जिह्यातील पिलखुकामध्ये प्रचारसभा घेतली. तेथून त्यांच्या गाडय़ांचा ताफा दिल्लीच्या दिशेने निघाला होता. हा ताफा गाझियाबादमधील डासना टोल नाक्याजवळ येताच महामार्गाशेजारी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी ओवेसी यांच्या कारवर चार ते पाच गोळ्या झाडल्या. यात कारचे नुकसान झाले.