उमदा आणि राजबिंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप ठाकूर

रमेश देव यांनी 1950 ते 2020 अशा 70 वर्षांच्या कालखंडात चित्रपट, नाटक, मालिका, दिग्दर्शन, निर्मिती अशा सर्वच क्षेत्रांत मुशाफिरी केली. मराठी मनावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा, व्यक्तित्त्वाचा, एक विलक्षण ठसा उमटविणारा असा राजबिंडा कलाकार म्हणजे रमेश देव. मराठी चित्रपटसृष्टीतला एक हिरा त्यांच्या जाण्याने आपण गमावला आहे.

एखादा कसलेला फलंदाज खेळपट्टीवर ठाण मांडून बसलाय. एकेक करत रन काढतोय. कधी चौकार मारतोय, कधी षटकार मारतोय. असं करत करत 92, 93 पर्यंत येतो, 94 पर्यंत आणि आता शतक झळकवणार असा त्याला स्वत:ला विश्वास असताना अचानक नियती तो विश्वास हाणून पाडते. नियतीपुढे त्याचं काहीच चालत नाही. याचं एक उदाहरण म्हणजे रमेश देव. अलीकडेच झी टॉकीजच्या वतीने त्यांचा खास सन्मान करण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले होते, मी नक्कीच शतक गाठणार आणि तुम्हाला भेटणार, परंतु दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही आणि शतकाच्या अगदी जवळ असतानाच त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव सांगत होता की, 2 फेबुवारीच्या संध्याकाळी साडेचार-पाच वाजेपर्यंत ते अगदी उत्साहात होते. इतकंच नाही तर अजिंक्यने त्यांना दुसऱ्या रूममधून हलवण्याबाबत रुग्णालयातील डॉक्टर आणि तिथल्या स्टाफशी चर्चाही केली होती. ते लवकर बरे होतील असा सगळ्यांचाच अंदाज होता; परंतु सहाच्या सुमारास त्यांची तब्येत खालावली आणि रमेश देव यांची छान रंगलेली इनिंग संपली. दूरदृष्टी, व्यावसायिक रणनीती, जनसामान्यांशी प्रेमाने वागण्याची वृत्ती, आपल्या व्यवसायातील कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक अशा सगळ्यांशी आपुलकीचे वागणे असं सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व दुर्दैवाने आज आपल्यात नाहीये. रमेश देव म्हणजे प्रचंड ऊर्जा, उत्स्फूर्तपणा यांचा मिलाफ होते. त्यांना कंटाळा हा शब्दच माहीत नव्हता. हिंदीमध्ये देव आनंद यांचा जो रुबाब होता, जे रूप होतं तोच रुबाब, रूप, लोकप्रियता, माध्यमांना असणारं आकर्षण, त्यांच्यावरचं चाहत्यांचं प्रेम तसंच त्यांनी टिकवलेला चार्म आणि टिकवलेलं सामाजिक भान या सगळ्याचं मिळून जे व्यक्तिमत्त्व होतं ते म्हणजे रमेश देव.
आपले बंधू उमेश देव यांच्यामुळे रमेश चित्रपटसृष्टीत आले. उमेश देव आणि दिग्दर्शक दिनकरराव पाटील यांचा परिचय होता. त्या परिचयातून त्यांना ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटात छोटीशी भूमिका मिळाली होती. चित्रपटाची लांबी वाढल्याने त्यांची ही छोटीशी भूमिका कापली गेली, परंतु चित्रपटाच्या श्रेयनामावलीत मात्र त्यांचं नाव राहिलं. त्यांचा पहिला चित्रपट असा ठरला. त्यानंतर दिनकरराव पाटील यांच्या ‘पाटलाचं पोर’ या चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका मिळाली. अशा छोट्या भूमिका साकारत, स्वीकारत आवडीने करत रमेश देव यांची अभिनेता म्हणून कारकीर्द सुरू झाली. मराठी, हिंदी चित्रपट, मालिका, चित्रपट दिग्दर्शक, निर्मिती, लघुपट, माहितीपट यांची निर्मिती असं सर्वच क्षेत्रांत ते आघाडीवर राहिले. रमेश देव म्हणजे कोणत्याही काळातील युवा पिढीसाठी रोल मॉडेल ठरावे असं त्यांचं व्यक्तित्व होतं.

एखाद्या क्षेत्रात काळ बदलला, पिढी बदलली, कामाची पद्धत बदलली तरीसुद्धा आपलं महत्त्व कसं अधोरेखित करत राहावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे रमेश देव. माठी, हिंदी चित्रपटांची त्यांची नावं खूप सांगता येतील. ‘मोलकरीण’पासून ‘आलीया भोगासी’ बऱ्याच चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. ‘अपराध’, ‘झेप’मध्ये. हिंदीमध्ये ‘आरती’, ‘आनंद’, ‘36 घंटे’, ‘जैसे को तैसा’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. ‘जैसे को तैसा’ या चित्रपटाबाबत विशेष सांगता येईल ते म्हणजे हा चित्रपट ज्या ‘राम और शाम’ या चित्रपटाचा रिमेक होता त्या मूळ चित्रपटामध्ये प्राण यांनी जी खलनायकाची भूमिका साकारली होती ती ‘जैसे को तैसा’मध्ये रमेश देव यांनी साकारली. एक चांगला खलनायक म्हणून गणले गेले होते. सुषमा शिरोमणी दिग्दर्शित ‘भिंगरी’ चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका जबरदस्त लोकप्रिय ठरली. अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या. भूमिकांचा गेट अप वा वेशभूषा हे त्यांचं वैशिष्टय़ ठरलं. विशेषत: खलनायकांच्या त्यांच्या भूमिकांमध्ये सातत्य आणि प्रभाव यामुळे त्यांना ‘मराठी चित्रपटसृष्टीचे प्राण’ असंदेखील म्हटलं गेलं. वय वाढलं तसं त्यांनी आपल्या भूमिकांचा मार्ग बदलला. नायकाकडून सहनायक, चरित्रनायक कधी खलनायक असा अभिनयाचा पट मांडताना व्यक्तिरेखेचं भान राखावं लागतं ते त्यांनी राखलं. राजा परांजपे हे त्यांचे गुरू. त्यामुळे अभिनयातला संयतपणा त्यांच्यात आपोआप रुजला. त्या काळात त्यांनी राजदत्त यांच्या चित्रपटात भूमिका साकारल्या. चित्रपटनिर्मितीच्या बाबतीत राजदत्त दिग्दर्शित ‘सर्जा’, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘वासुदेव बळवंत फडके’ असेही काही उल्लेखनीय चित्रपट त्यांनी निर्मित केले. त्यांनी ‘साने गुरुजी’ यांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन केले. ‘गोष्ट प्रेमाची’ या हलक्याफुलक्या विषयाच्या चित्रपटाचंही त्यांनी दिग्दर्शन केलं. म्हणजे निर्मिती, दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही त्यांनी वैविध्य राखलं.

त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्यांची सहचारिणी. अभिनेत्री नलिनी सराफ म्हणजे सीमा देव. ‘आलिया भोगासी’सारख्या चित्रपटात त्यांनी एकत्र भूमिका केल्या होत्या. ‘सरस्वती चंद्र’, ‘आनंद’ या हिंदी चित्रपटांत त्यांनी एकत्र भूमिका केल्या. सुरुवातीच्या काळात एकत्र भूमिका करत असतानाच त्यांचं प्रेम जमलं. कोल्हापूरमध्ये दोघेही विवाहबद्ध झाले. अभिनय देव आणि अजिंक्य देव या त्यांच्या दोन्ही मुलांनी कलाक्षेत्रातच पाऊल टाकलं. अजिंक्य देवने अभिनयाच्या तर अभिनय देवने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवलेला आहे. दत्तात्रय फिल्म्स या त्यांच्याच निर्मिती संस्थेच्या ‘जेता’ चित्रपटात रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक वर्षांनी एकत्र भूमिका साकारली. अलीकडच्या काही सामाजिक गोष्टींचं दर्शन घडवणारा, त्यावर भाष्य करणारा असा हा चित्रपट आहे.

देव कुटुंबीयांशी गेली 35 वर्षे, अतिशय जवळचा, जिव्हाळ्याचा संबंध आहे. रमेश देव भेटले की, एक ठरलेलं वाक्य म्हणायचे, काय मित्रा कसा आहेस? मी अनेकदा त्यांच्या घरी जायचो. पूर्वी ते जुहू-कोळीवाडा येथील मेघदूत या इमारतीत राहायचे. 70 च्या दशकात ज्या वेळेस ते मेघदूत या इमारतीत राहायला गेले तेव्हा काही मराठी साप्ताहिकात याची बातमी आली होती. त्या काळात मराठी कलाकार जुहूला राहायला जाणं हे विशेष होतं. 2002 मध्ये ते जुहू-वर्सोवा लिंक रोडवर रूपरंग सोसायटीत राहायला आले. हे घर अधिक प्रशस्त आणि आधुनिक होतं. त्यांच्यातली माणुसकी, प्रेम, जिव्हाळा हे याही घरात सगळ्यांना अनुभवायला मिळालं. कोणालाही भेटताना त्याला तो नवखा आहे असं ते अजिबात जाणवू देत नसत. कुठल्याही वयाच्या, वर्गाच्या माणसाला त्यांनी कायम आपलं मानलं

रमेश देव यांनी 1950 ते 2020 अशा 70 वर्षांच्या कालखंडात चित्रपट, नाटक, मालिका, दिग्दर्शन, निर्मिती अशा सर्वच क्षेत्रांत मुशाफिरी केली. फिटनेसबाबत ते कायम आग्रही असत. अशी अनेक वैशिष्ट्यं असणारा, मराठी मनावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा, व्यक्तित्वाचा, एक विलक्षण ठसा उमटविणारा असा राजबिंडा कलाकार म्हणजे रमेश देव. रमेश देव यांची स्मरणशक्ती याही वयात तल्लख होती. गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो असताना ते ‘आनंद’, ‘कसोटी’ या चित्रपटाच्या सेटवरचे किस्से त्यांनी ऐकवले. छोटे छोटे तपशीलही ते देत असत. खूप किस्से, आठवणी या क्षणाला दाटून येत आहेत. व्यापक कार्यकर्तृत्व असलेला, मराठी चित्रपटसृष्टीतला एक हिरा त्यांच्या जाण्याने आपण गमावला आहे.

[email protected]