
घरफोडी करणाऱ्या इजाज वाहब सय्यद आणि अहमद शकील खान या दोघांना सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली. चोरी केल्यानंतर ते काही रक्कम दान करण्यासाठी अजमेरला जायचे.
मालवणी येथे राहणारे इजाज आणि अहमद हे दोघे रात्रीच्या वेळेस घरफोड्या करायचे. गेल्या वर्षी या टोळीने सांताक्रुझच्या गझदरबंध येथे एकाच्या घरी घरफोडी करून टीव्ही, सोन्याचे दागिने, चांदीच्या देवाच्या मूर्ती चोरून पळ काढला होता. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक योगेश पवार यांचे पथक तपास करत होते.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली. तेव्हा एका फुटेजमध्ये इजाज आणि अहमद दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांची माहिती काढली. इजाज आणि अहमद हे दोघे नुकतेच अजमेर येथून परतल्याची माहिती समजताच सांताक्रुझ पोलिसांनी सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेतले.























































