
मराठी नाटय़वर्तुळातील महत्त्वाची आणि विशेष एकांकिका स्पर्धा असलेली बोलीभाषा एकांकिका स्पर्धा नुकतीच पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये मुंबईच्या जिराफ थिएटरने सादर केलेली ‘स्टार’ ही सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली आहे. ‘स्टार’ला नटश्रेष्ठ गोपीनाथ पुरस्कार मिळाला आहे. 21 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
बोलीभाषा एकांकिका स्पर्धेत राज्यभरातून 40 संघांनी प्राथमिक फेरीत भाग घेतला होता. त्यातून सात संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. सुप्रिया प्रोडक्शन, व्हिजन व्हॉइस अॅण्ड अॅक्ट आणि धी गोवा हिंदू असोसिएशन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात सोमवारी स्पर्धेची अंतिम फेरी रंगली. स्पर्धेचे उद्घाटन सचिन गोस्वामी यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक विजय पेंकरे, विवेक देशपांडे आणि सुप्रिया विनोद यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी सुभाष सराफ, अरुण नलावडे, शिरीष बोरकर, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, पल्लवी फाऊंडेशनचे भाऊ कोरगावकर, राजेंद्र पै, प्रदीप कबरे, सुप्रिया चव्हाण, श्रीनिवास नार्वेकर आदी उपस्थित होते.
मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘भाग धन्नो भाग’ या एकांकिकेला द्वितीय तर स्टोरिया प्रोडक्शन कल्याणच्या ‘सवार भवानी चौकामधी’ या एकांकिकेला तृतीय पारितोषिक मिळाले.
बोलीभाषा एकांकिका स्पर्धा प्रसिद्ध नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या संकल्पनेतून प्रसिद्ध नाटय़निर्माते गोविंद चव्हाण यांनी सुरू केली होती.
लक्षवेधी एकांकिका
राकस कलासक्त, मुंबई
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
प्रथम – राकेश जाधव स्टार
द्वितीय – विनायक चव्हाण, भाग धन्नो भाग
सर्वोत्कृष्ट अभिनेता
प्रथम – अनिल आव्हाड, स्टार
द्वितीय – संदेश रणदिवे, सवारी भवानी चौकामधी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
प्रथम – श्रुती पालव, भाग धन्नो भाग
द्वितीय – आर्चिषा मोरे, राकस
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता
कार्तिक चौरासिया भाग धन्नो भाग
सर्वोत्कृष्ट लेखक –
प्रथम – यश नवले, सवारी भवानी चौकामधी
द्वितीय – तेजस साठे-मयूरेश भोर भाग धन्नो भाग



























































