मुंबईत कंपाऊंडर झाला डॉक्टर, पाच जणांकडून रुग्णांवर ऍलोपॅथी उपचार, 6 जणांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईमध्ये डॉक्टरांच्या अनुपस्थितीमध्ये रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या कंपाऊंडवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र नसताना रुग्णांवर ऍलोपॅथिक उपचार करणाऱ्या पाच जणांना पकडण्यात आले आहे. गोरेगावात ही कारवाई करण्यात आली.

गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील प्रेमनगर परिसरात सहाजण डॉक्टर नसताना वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-10 ला मिळाली. त्यानुसार पथकाने माहितीची शहानिशा करून पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याना सोबत घेऊन सहा क्लिनिकवर छापा टाकला. डॉ. मुकेश यादव क्लिनिकमध्ये कंपाऊंडरचे काम करणारा इब्रार सय्यद (वय – 24) हा रुग्णांवर उपचार करताना सापडला.

तसेच सर्वेश यादव (वय – 31), डॉ. छोटेलाल यादव (वय – 33), डॉ. ओमप्रकाश यादव (वय – 45), डॉ. सपना यादव (वय – 29) हे ऍलोपॅथिक उपचार करताना सापडले. या पाच जणांकडे आवश्यक नोंदणी पत्रांची मागणी केली असता ती त्यांच्याकडे नव्हती.

सहाही क्लिनिकमधून स्टेथोस्कोप, इंजेक्शन, ,सीरिंज, सीरप सेट, रबर स्टांपसह प्रिस्क्रिप्शन बूक आणि अन्य कागदपत्रे जप्त केलेी आहे. पोलिसांनी विविध साहित्य जप्त करून महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायद्याअंतर्गत आरोपींवर कलम 33 आणि 36 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाईसाठी गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.