
केज-अंबाजोगाई रस्त्यावरील कुंबेफळ जवळ चालत्या कारने पेट घेतल्याची घटना आज सकाळी घडली आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे जिवीतहानी टळली, परंतू कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
आज सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास लातूरकडून निघालेली एमएच-48 एस-2852 कार संभाजीनगरच्या दिशेने जात होती. केज तालुक्यातील कुंबेफळ जवळ येताच कारने अचानक पेट घेतला. हा प्रकार चालकाच्या लक्षात येताच गाडी थांबवून आतील सर्वांना खाली उतरविले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जिवीतहानी टळली.
सदर घटनेची माहिती केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांना स्थानिक नागरिकांनी दिली आहे. पोलीस पुढील तपास करत असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.


























































