कागलमध्ये मद्यधुंद कारचालकांची दोन दुचाकींना धडक, महिलेसह मुलगी ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मद्यधुंद अवस्थेतील चालकाने दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत एका महिलेसह बालिका ठार झाली असून, अन्य दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. कागल तालुक्यातील उंदरवाडी-सरवडे रस्त्यावर हा अपघात झाला. याप्रकरणी संबंधित कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाया तानाजी पाटील (वय 45, रा. नाधवडे, ता. भुदरगड) व अन्विता प्रकाश कांबळे (वय 4) अशी मृतांची नावे आहेत. जयवंत गणपती पाटील (वय 25), प्रकाश शिवाजी कांबळे हे जखमी आहेत. त्रिलोक महादेव तांबे (वय 43, मूळ रा. कणेरी ता. करवीर, सध्या रा. कागल) असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे.

त्रिलोक तांबे हा चारचाकी गाडीने मद्यधुंद अवस्थेत सरवडेकडून मुधाळ तिट्टय़ाकडे येत होता. सरवडे-उंदरवाडी दरम्यान असलेल्या ओढय़ालगत त्याचा ताबा सुटल्याने मुदाळ तिट्टय़ाकडून सरवडेकडे चाललेल्या दोन दुचाकींना धडक दिली. त्यानंतर चारचाकी गाडी तोडलेल्या झाडाच्या बुंध्याला धडकली. या धडकेत हीरो पॅशन या दुचाकीवरील जयवंत पाटील व त्यांच्या चुलती छाया पाटील आणि हीरो स्प्लेंडर या दुचाकीवरील प्रकाश कांबळे व त्यांची मुलगी अन्विता हे जखमी झाले. अपघातानंतर सर्व जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी छाया पाटील यांचा मंगळवारी, तर अन्विताचा आज मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.