
आपल्या घरातील लग्न संस्मरणीय व्हावे, अशी अनेक जणांची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येक जण भरमसाट पैसा खर्च करतात. अनेक जण लग्नाची वरात थाटामाटात काढतात. अशा वरातींना वेगळा लूक देण्यासाठी एका व्यापाऱयाने चक्क नॅनो कारचे रूपांतर हेलिकॉप्टरमध्ये केले आहे. असे ‘जुगाड’वाले हेलिकॉप्टर लग्नसोहळ्यात भाडेतत्त्वावर दिले जाणार आहे. यामुळे हेलिकॉप्टरमधून वरात नेण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. अर्थात हेलिकॉप्टर आकाशात उडणार नाही, तर रस्त्यावर धावणार…
बिहारमधील पश्चिम चंपारण्य जिह्यातील बगहामध्ये हे खास हेलिकॉप्टर तयार होतंय. हेलिकॉप्टरचे बुकिंग आतापासून सुरू झाले आहे. आतापर्यंत हे हेलिकॉप्टर पूर्णपणे तयार झालेले नाही, मात्र बुकिंग आतापासून सुरू झाले आहे. हेलिकॉप्टरचे निर्माते गुड्डू शर्मा यांनी नॅनो कारला हेलिकॉप्टरचे रूप दिलंय. त्याच्या निर्मितीसाठी दीड लाख रुपयांपर्यंत खर्च आलाय. गाडीला हायटेक लूक देण्यासाठी यामध्ये इलेक्ट्रिक सेन्सर लावण्यात आले आहेत. हेलिकॉप्टरमध्ये पंखे आणि लाइट सर्व काही सेन्सरद्वारे नियंत्रित होतात. बाहेरून बघितलं तर हे अगदी खरेखुरे हेलिकॉप्टरच वाटते. आतापर्यंत 20 हून अधिक जणांनी या काररूपी हेलिकॉप्टरचे बुकिंग केले आहे.
हेलिकॉप्टरसाठी काम करणाऱया कामगारांनी सांगितले, आम्ही अनेक विवाह सोहळे टीव्हीवर पाहिले आहेत, ज्यामध्ये नवरदेव हेलिकॉप्टरमधून पोहोचतो. ते वधूवरांना आणण्यासाठी हेलिकॉप्टर भाडय़ाने घेतात. तसेच नववधूला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून घरी घेऊन जावं अशी अनेकांची इच्छा असते, मात्र सगळ्यांची इच्छा पूर्ण होत नाही. आता या हेलिकॉप्टरमधून ती पूर्ण होणार आहे.






























































