
गोरेगाव सिद्धार्थ नगर येथील पत्राचाळच्या पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकाच्या बांधकामाचा शुभारंभ उद्या मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. पत्राचाळीतील 672 मूळ रहिवाशांना पुनर्विकास प्रकल्पात प्रत्येकी 650 चौरस फुटांचे घर मालकी हक्काने मिळणार आहे.
गोरेगाव (प.) येथील प्रबोधन क्रीडा भवनात संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा व अन्य उपस्थित राहणार आहेत.



























































