अत्तराचा फाया…फुलवाचा नावीन्यपूर्ण लावणी प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, फुलवा खामकरने दिग्दर्शित केलेली लावणी. लॉकडाऊनमध्ये सारेच घरात अडकून पडले होते. याच काळात एखाद्या लग्नघरात नेमके काय घडले असेल यावर हा चित्रपट आहे. त्यामुळे ही लावणीदेखील घरातल्या घरात चित्रीत करण्यात आली आहे.

अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ चित्रपटात अभिनेत्री योगीता चव्हाण ‘अत्तराचा फाया’ ही लावणी सादर करत आहे. योगीता ही सध्या ‘जीव माझा गुंतला’ या टीव्ही मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.

लावणीच्या अनोख्या प्रयोगाविषयी नृत्य दिग्दर्शक फुलवा खामकर म्हणते, पहिल्या लॉकडाऊननंतर माझं हे पहिलंच काम होतं. ही लावणी चित्रपटामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, हे मला चित्रपटाची कथा ऐकून कळलं होतं. चित्रपटाची कथा एकाच घरात घडत आहे. त्यामुळे ही लावणीसुद्धा घरातच हवी हे मी ओळखलं होत. मग ती एकाच खोलीत साकारायची आम्ही ठरवलं. गीत रवींद्र मठाधिकारी यांनी लिहिले आहे. मैथिली जोशी यांच्या आवाजात ते स्वरबद्ध झाले असून संगीत अविनाश विश्वजीत यांचे आहे.