
कोरोना लसीकरणाचा तपशील देण्यास नकार दिल्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत सहभाग नाकारण्यात आलेल्या सर्बियाच्या जागतिक नंबर वन नोवाक जोकोविचमागची साडेसाती संपण्याची चिन्हेच दिसत नाहीत. आता दुबई ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जोकोला जागतिक 123 व्या मानांकित जिरी वेस्ली याने 6-4, 7 -6 (7 /4 ) असे पराभूत केल्याने त्याच्या नंबर एक स्थानाला धक्का बसला आहे. जोकोविचच्या या पराभवाचा लाभ रशियाचा डॅनियल मेदवेदेवला होणार आहे. मेदवेदेव आता नव्या गुणांकनात जगात टॉपच्या स्थानावर पोहचला आहे.
28 फेब्रुवारीला जागतिक टेनिस महासंघ एटीपी गुणांकनाची नवी यादी जाहीर करणार आहे. टेनिसचा अनभिषिक्त सम्राट म्हणून जोकोविच याने सुमारे 361 आठवडे जागतिक नंबर वन स्थानावर राहिला होता. 2020 नंतर आता टेनिस जगतातील अग्रमानांकनावरून जोकोविचची गच्छंती होणार आहे.
नंबर वन खेळाडू म्हणून मी रशिया, युक्रेन
या दोघांनाही शांततेचे आवाहन करतो – मेदवेदेव
रशियाचा डॅनियल मेदवेदेव आता जोकोविचच्या जागी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा पुरुष खेळाडू बनेल. 28 फेब्रुवारीला नवीन क्रमवारी जाहीर होणार आहे. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे आणि यादरम्यान मेदवेदेवला ही आनंदाची वार्ता मिळाली आहे. ‘या तणावाच्या परिस्थितीत नंबर वन खेळाडू म्हणून मला शांततेचे आवाहन करायचे आहे,’ असे मेदवेदेव म्हणाला.जागतिक अग्रस्थान मिळवणारा मेदवेदेव हा तिसरा रशियन खेळाडू असेल. यापूर्वी येवगेनी काफिलनिकोव्ह (1999) आणि मरात साफिन (2000-01) यांनी ही कामगिरी केली होती. बिग फोर (नदाल, फेडरर, जोकोविच आणि ऍण्डी मरे) व्यतिरिक्त पहिल्या क्रमांकावर असलेला शेवटचा खेळाडू ऍण्डी रॉडिक होता.





























































