
लघवी ही शरीरातील नको असलेली द्रव्य बाहेर काढण्याची नैसर्गिक सोय आहे. तिचा रंग, तिला येणारा वास यांमुळे मानवी शरीरातील अनेक बदलांची माहिती मिळू शकते. लघवीला येणारा तीव्र दुर्गंध हा शरीरातील काही बिघाडांचा संकेत देतो. त्याच्याकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे.
लघवीला तीव्र दुर्गंध येण्याची काही ठरावीक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे युटीआय. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन अर्थात मूत्र मार्गाचा संसर्ग झाल्याने लघवीला दुर्गंध येतो. या संसर्गामुळे किडनी, ब्लॅडर या अवयवांशी जोडलेल्या वाहिन्यांच्या कार्यावर प्रभाव पडतो. त्याचं पहिलं आणि स्पष्ट लक्षण दुर्गंध हे असतं. त्यामुळे वेळीच त्यावर इलाज करावा, जेणेकरून तो संसर्ग किडनी पर्यंत पोहोचणार नाही.
दुर्गंधाचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसणं. लघवीवाटे शरीरातील विषारी आणि निरुपयोगी द्राव बाहेर टाकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम आणि मदत पाणी करतं. पाण्याचं योग्य प्रमाणात सेवन न केल्यास ते द्राव शरीरावाटे निघून जाण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे लघवीचा रंग बदलून त्याला दुर्गंध येतो.
कॅफिनचं अधिक प्रमाणातील सेवन हे देखील एक प्रमुख कारण आहे. कॉफी या उत्तेजक पेयात आढळणारं कॅफिन हे शरीरासाठी काही विशिष्ट प्रमाणातच लाभदायक असतं. अधिक प्रमाणातील कॅफिनमुळे लघवीला दुर्गंध येतो. तसंच कॅफिन शरीरातील पाण्याचं प्रमाणही कमी करतं. त्यामुळे कॅफिनचं अतिरिक्त सेवन टाळणं उत्तम.
ज्यांना आपल्या शरीरातील साखरेची पातळी माहीत नसते, त्यांच्याही लघवीला दुर्गंध येतो. मधुमेहग्रस्त रुग्णांचं शरीर साखर पचवू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या लघवीला दुर्गंध येतो.
लैंगिक संसर्गातून झालेले आजारही कधी कधी लघवीच्या दुर्गंधाला कारणीभूत असतात. या संसर्गामुळे मूत्रमार्गाला सूज येते आणि लघवीचा गंध बदलतो. महिलांना योनीमार्गात होणाऱ्या जळजळीमुळे देखील हा त्रास होऊ शकतो.
आपल्या त्वचेवर कँडिडा नावाची एक बुरशी असते. ही बुरशी शरीरातील अनेक भागांवर असते. पण, जेव्हा ही वाढू लागते तेव्हा शरीराला खाज सुटू लागते. ही बुरशी जर मूत्रमार्गा जवळील त्वचेवर असेल तरीही लघवीला दुर्गंध येतो. पुरुषांच्या तुलनेने महिलांना याचा त्रास जास्त होतो. मूत्रमार्ग लालसर होणे, पांढरा स्राव जाणे, सूज येणे इत्यादी लक्षणे आढळल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा.




























































