राहुरी नगरपरिषदेचा 144 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर, यावर्षी कोणतीही करवाढ नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहुरी नगरपरिषदेचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा कुठलीही करवाढ नसलेला 144 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय मुख्याधिकारी सचिन बांगर यांनी दिली.

नगरपरिषदेचे लेखाधिकारी अर्जुन बर्गे यांनी 32 लाख 3 हजार शिलकीचे, तसेच 144 कोटी रुपयांचे कुठलीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकाला नगरपरिषदेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. प्रमुख तरतुदींमध्ये 38 कोटी 64 लाख महसुली जमा, 47 कोटी 34 लाख महसुली खर्च, 93 कोटी 29 लाख भांडवली जमा, 96 कोटी 93 लाख भांडवली खर्च, वैशिष्टय़पूर्ण कामांसाठी 5 कोटी रुपये, रस्तानिधी 2 कोटी रुपये, स्थानिक विकास निधी 1 कोटी रुपये, नगरोत्थान महाअभियान (राज्य स्तर) 40 कोटी रुपये, विशेष वैशिष्टय़पूर्ण योजना 10 कोटी रुपये, 15वा वित्त आयोग 8 कोटी रुपये या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.

या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकातून बगिचा, वृक्षारोपण, हरितपट्टे विकसित करणे, भूमिगत गटार योजना राबविणे, रस्ते खडीकरण, काँक्रिटीकरण, डांबरीकरण, विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका, शहर सुशोभीकरण, 2 कोटी 60 लाख रुपये खर्चाचा जलतरण तलाव या कामासाठी निधीची तरतूद करण्यात येऊन अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या सभागृहात मंजुरी मिळालेले अंदाजपत्रक लेखाधिकारी अर्जुन बर्गे व योगेश सर्जे यांनी तयार केले. या सभेला नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी विकास घटकांबळे, लेखापरीक्षक योगेश सर्जे, स्वप्नील काकड, राजेंद्र पवार, राजेंद्र जाधव, सुरेंद्र आंधळे, सुनील फडके, योगेश शिंदे, काकासाहेब अढागळे, भरत मोरे, सुभाष बाचकर यांच्यासह नगरपरिषदेच्या सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.