
चंद्रपूर प्रीमियर लीग CPL टी 20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आठव्या पर्वाचे विजेतेपद डायनॅमिक फायटर्स संघाने पटकाविले. त्यांना 1 लाख 11 हजार 111 रुपये रोख आणि चमचमती ट्रॉफी प्रदान करण्यात आली. शहरातील लाईफ फाउंडेशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते.
स्थानिक रामनगरच्या सेंट मायकेल शाळेच्या मैदानावर या स्पर्धेत 16 संघांचे प्रत्येकी 15 खेळाडू असे एकूण 240 खेळाडू विजेतेपदासाठी झुंजले. सामन्यांसाठी 4 महिने परिश्रम करून हिरवेगार मैदान खास तयार केले गेले होते. 10 फेब्रुवारी रोजी या क्रिकेट कार्निव्हलचा प्रारंभ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षकअतुल कुलकर्णी, सेंट मायकेल शाळेचे प्राचार्य विकास कोल्हेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. गेले काही दिवस ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकण्यासाठी खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले. रविवार 27 फेब्रुवारी रोजी स्पर्धेचा अंतिम सामना भद्रावती ग्रेनेड्स विरुद्ध डायनॅमिक फायटर्स संघात खेळला गेला.
नाणेफेक जिंकून डायनॅमिक फायटर्सने प्रथम फलंदाजी केली. यात त्यांनी निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 152 धावा केल्या. उत्तरात भद्रावती ग्रेनेड्स संघ 20 ओव्हर्समध्ये केवळ 139 धावा करू शकला. अशा रीतीने डायनॅमिक फायटर्स संघ 13 धावानी विजेता तर भद्रावती ग्रेनेड्स संघाला उपविजेतेपद मिळाले.
पारितोषिक वितरण सोहळ्याला खास नागपूरहून आलेल्या वेकोली नागपूर क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापकआभाश चंद्र सिंग यांची उपस्थिती होती. तर विशेष अतिथी रुपात चंद्रपूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांची उपस्थिती होती. मान्यवर अतिथींचा स्मृतिभेट देत सन्मान करण्यात आला. लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष संजय तुमराम यांनी स्पर्धा आयोजनाबाबत आपली भूमिका विशद केली. आपल्या संबोधनातून आभाशचंद्र सिंग यांनी CPL च्या आयोजनाचे कौतुक केले. तर खेळाच्या मैदानावर चंद्रपूरच्या क्रिकेटपटूंची कौशल्यपूर्ण कामगिरी लक्षवेधी असल्याचे मत डॉ. राठोड यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
पुरस्कार वितरणाच्या प्रारंभी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हातभार लावणाऱ्या ग्राउंड स्टाफ, अंपायर, स्कोअरर आशुतोष चिमुरकर आणि समालोचक मोंटू सिंग यांना सन्मानीत केले गेले.अंतिम सामन्याच्या सामनावीराचा मान 4 गडी बाद करणा-या डायनॅमिक फायटर्सच्या अतुल कुशवाह यांना देण्यात आला. स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज पुरस्कार भद्रावती ग्रेनेड च्या स्पर्धेत एकूण 310 धावा काढणाऱ्या कुशल पिंपळकर याला प्रदान करण्यात आला.स्पर्धेच्या सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार थ्री एसेसच्या इम्रान सिद्दिकी यांना देण्यात आला.स्पर्धेच्या सर्वोत्तम विकेट कीपरचा बहुमान थ्री एसेस च्या अमोल बारापात्रे यांना मिळाला तर 6 झेल घेणाऱ्या ब्लॅक गोल्ड च्या विपुल राठोड ने सर्वोत्तम फिल्डरचा पुरस्कार पटकावला.5 सामन्यांमध्ये 8 विकेटसह 269 धावा करणाऱ्या थ्री एसेसच्या शुभम दुबेला स्पर्धाविराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.स्पर्धेतील सर्वात शिस्तबद्ध संघ म्हणून स्टील वॉरियर्स संघ पारितोषिक देत गौरविण्यात आला.




























































