आरोग्य – उन्हाळा आणि किडनी स्टोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. नसरीन गीते
(युरोलॉजिस्ट, अपोलो स्पेक्ट्रस रुग्णालय, मुंबई)
>> डॉ. प्रीतम मून
(सल्लागार फिजिशियन, वोक्हार्ट रुग्णालय)

ऊन्हाळा सुरू झाल्याने आता उष्म्यामुळे मूतखडय़ाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. मूतखडय़ाच्या आजाराबाबत जागरूकता वाढल्याने पोटाचे एक्स-रे, सोनोग्राफी अशा विविध तपासण्या वाढल्या आहेत. वैद्यकीय चाचण्या वाढल्याने मूत्रखडय़ाने पीडित रुग्णांची आकडेवारी वाढलेली दिसून येत आहे. विशेषतः मूतखडय़ाचे निदान होणाऱया बहुतांश रुग्णांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसू येत नाहीत. दर आठवडय़ाला रुग्णालयात साधारणतः 9 ते 10 रुग्ण उपचारासाठी येतात, असे तज्ञ डॉक्टरांनी म्हटले आहे. तापमान वाढीमुळे उन्हाळ्याच्या ऋतुमध्ये मूतखडा होण्याची शक्यता वाढते. विशेषतः मूतखडय़ाची ही समस्या स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते.

तज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, उन्हाळ्यात घामावाटे आपल्या शरीरातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचे उत्सर्जन होते; मात्र तेवढय़ा प्रमाणात पाणी आपल्या शरीरात जात नाही. या पाण्याच्या कमतरतेमुळे मूत्र संग्रहण होण्यास कारणीभूत ठरतो. ज्यामुळे मूतखडा होण्याचा धोका वाढतो. लघवीमध्ये कॅल्शियम आणि युरिक ऑसिड तयार होण्यामुळे देखील किडनी स्टोन तयार होतात. जेव्हा वातावरणातील उष्मा वाढतो तेव्हा किडनी स्टोनच्या प्रकरणांमध्ये वाढ होते. खाण्यामध्ये तिखट, तळलेले, कोरडे, वातूळ पदार्थ जास्त असतात अशांना मूतखडा होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच पोटात दुखत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच निदान व उपचार करून घ्या. वेळीच उपचार न झाल्यास मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो. उन्हाळ्यात मूतखडय़ाच्या रुग्णांमध्ये वाढ होतेय असं नाही तर मूतखडय़ाच्या विकाराबाबत जागरुकता निर्माण झाल्याने तपासण्या वाढल्या आहेत. यामुळे अनेक रुग्णांची नोंद होत आहे. यात मूतखडय़ाचा त्रास असलेल्या अनेक रुग्णांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं नसतात. मूतखडय़ातील काही खडे कोणत्याही उपचाराशिवाय स्वतःहून निघून जातात तर काहींना त्वरित काढून टाकणे आवश्यक असते. शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी केली जाऊ शकते. ज्यामध्ये शॉक वेव्ह मूत्रपिंडातील दगडांचे लहान तुकडे करतात जे नंतर आपल्या मूत्रमार्गातून आणि मूत्रमार्गे शरीराबाहेर निघून जातात. यूरिटेरोस्कोपी देखील निवडली जाऊ शकते. येथे लहान दगड बाहेर काढण्यासाठी मूत्रवाहिनीमध्ये एक लांब नळीसारखे उपकरण घातले जाते, जे या खडय़ांचे लहान तुकडे करतात (दगडाचा आकार असल्यास लेसर वापरून.) मोठय़ा आणि गुंतागुंतीच्या दगडांसाठी पर्क्युटेनियस नेफ्रोलिथोटॉमी प्रक्रिया आवश्यक आहे.

उष्णतेमुळे मूतखडय़ाचा त्रास होण्याची शक्यता असते. या कालावधीत अनेक लोकांना मूत्राशयात जळजळ होणं, पोटात वेदना जाणवू शकतात. याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. सध्या रुग्णालयात किती रुग्ण उपचारासाठी येत आहेत. मूतखडय़ाचा त्रास टाळण्यासाठी अधिक पाणी पिणे, आहारात बदल करणे, थंड पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करणे गरजेचे आहे. याशिवाय नियमित व्यायाम करा, कार्बोनेटेड, खारट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा, ज्यामुळे मूतखडा तयार होऊ शकतो. मूत्राशय नियमितपणे रिकामे करा.