
>> मंगल गोगटे
विमानाच्या मार्गात येणारे अडथळे लक्षात यावेत यासाठी विशिष्ट प्रकारच्या दिव्यांची व्यवस्था केली असते. ही व्यवस्था स्थिर अडथळय़ांची दृश्यमानता वाढवण्यासाठी केली जाते. जिथे विमानं अगदी कमी उंचीवर येण्याची शक्यता असते तिथे तर उंच होत गेलेल्या बांधकामावर, उंच पुलांवर, मोठय़ा टॉवर्सवर देखील अशा दिव्यांची व्यवस्था असते. यासाठी जास्तीत जास्त दृश्यमानता असण्यासाठी आणि टक्कर होणे टाळण्यासाठी ही प्रकाश योजना उच्च तीव्रतेचा स्ट्रोब वा एलइडी लाईटस् वापरून केली जाते, ज्यामुळे वैमानिकांना अनेक मैल दुरूनही ते दिसतात. याबाबतच्या साऱया सूचना विमान वाहतूक विभाग जारी करतं.
हे चेतावनी दिवे साधारणतः दोन प्रकारचे असतात. (1) लाल दिवे जे सतत प्रकाशित होतात वा काही सेकंदांच्या अंतराने चालू व बंद होतात. (2) झेनॉन फ्लॅश पांढरे दिवे (उच्च वा मध्यम तीव्रतेचे) पूर्वी सर्व अडथळ्यांसाठी लाल दिवे (इनॅन्डेसेंट फिलामेंट बल्ब) वापरले जात. यांचं आयुष्यमान कमी असतं, म्हणून आता ते वाढवण्यासाठी ते खडबडीत डिझाईनचे बनवले जातात आणि सामान्य ऑपरेटिंग पॉवरच्या खालच्या पॉवरला वापरले जातात. आताच्या तांत्रिक बदलानुसार बनवलेले एलईडी दिवे लक्षणीयरीत्या जास्त आयुष्यमानाचे असतात. त्यामुळे देखभालीचा खर्च कमी होतो व दिव्यांची विश्वासार्हता वाढते. काही उत्पादकांनी झेनॉनच्या ऐवजी एलईडीसारखे मध्यम तीव्रतेचे पांढरे स्ट्रोब तयार केले आहेत. झेनॉन फ्लॅशर्स दृश्यतेसाठी जास्त प्रभावी असले तरी ते वारंवार बदलण्याची गरज पडते. म्हणून ते फारसे पसंत केले जात नाहीत.
दिवसा पांढरे स्ट्रोब्स आणि लाल दिवे असंही करता येतं. साधारणतः शहरी भागात लाल दिवे वापरले जातात. कारण वैमानिकांना ते वरून दिसायला, शोधायला सोपे पडतात. पांढरे स्ट्रोब शहरी भागातही वापरले जातात, परंतु दाट लोकवस्तीत ते वापरू नयेत अशी शिफारस केलेली आहे. कारण पांढरे दिवे रात्रीच्या वेळी पार्श्वभूमी प्रकाशात विलीन होतात. त्यामुळे ते लक्षात येत नाही व धोका वाढतो. परंतु आजूबाजूचे रहिवासी फार जास्त उजेडाची तक्रार करू शकतात.
डय़ुएल लायटिंग वा लाईट्सची दुहेरी व्यवस्था अशी असते जिथे संरचनेत दिवसा पांढरे व रात्री लाल दिवे वापरले जातात. साधारणतः शहरी भागात अशा व्यवस्थेला प्राधान्य दिलं जातं. यात फायदे असे की पेंटिंग करण्यापासून या संरचनेला सूट मिळते आणि समजा जर का वरचे लाल लाईट अयशस्वी झाले तर ती प्रणाली पांढरे स्ट्रोब वापरते. लाल इनॅडेसेंट बीकन्स कॅनडा आणि इंग्लंडमधे हळूहळू सेवेतून कमी केले जात आहेत आणि लाल स्ट्रोब किंवा लाल एलईडी यांनी बदलले जात आहेत.
उच्च दाबाच्या पॉवर लाईन्स प्रती मिनीट 60 वेळा चमकण्यासाठी सुसज्ज असतात. हे स्ट्रोब एकाच वेळी न चमकण्यासाठी निर्दिष्ट केलेले असतात. हा अनोखा सिग्नल वैमानिकांना समजतो. इलेक्ट्रीक ट्रान्समिशन टॉवरवरचे दिवे आसपासच्या विद्युत क्षेत्रातून किंवा कंडक्टरव्दारे विद्युत प्रवाहाने तयार केलेल्या चुंबकीय क्षेत्रातून दिवे ऊर्जावान केले जातात.
विमानतळाच्या जवळ असलेल्या लहान संरचनेसाठी सुध्दा अशा दिव्यांची गरज असते. जगातल्या काही उंच संरचनांवर नॉन-स्टॅंडर्ड चेतावनी दिवे लावलेले आहेत. या दिव्यांचा देखील पर्यावरणीय परीणाम असतो. एकतर ते दिवे प्रकाश प्रदूषण करतात आणि दुसरं म्हणजे पक्ष्यांवर होणारा परिणाम. अनेक पक्षी ‘टॉवर किल’ मधे मरून जातात. असा अंदाज आहे की फक्त अमेरिकेमध्ये दरवर्षी 40 ते 50 लाख पक्षी मारले जातात. कमी दृश्यमानता आणि रात्रीच्या उजेडामुळे स्थलांतरात येणाऱया अडचणी यामुळे पक्षी टॉवर्सवर आदळून मरतात.




























































