कानिफनाथांच्या दर्शनासाठी भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रंगपंचमीच्या दिवशी नाथांच्या समाधीचे दर्शन घेताना मुख्य मंदिरात मोठय़ा संख्येने भाविकांना न सोडता टप्प्याटप्प्याने सोडण्याचा निर्णय आज झालेल्या मढीयात्रा नियोजन बैठकीत घेण्यात आला.

मढी देवस्थानच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार श्याम वाडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, गटविकास अधिकारी शीतल खिंडी, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण व सर्व शासकीय खात्याचे अधिकारी उपस्थित होते. होळी, रंगपंचमी व पाडवा अशा तीन टप्प्यांत मढी यात्रा पार पडत असली, तरीही रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथांनी समाधी घेतली असल्याने या दिवशी भाविकांची मोठी गर्दी गडावर जमा होत असते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत काही ग्रामस्थांनी तिसगाव ते मढी मार्गावरील खड्डे बुजवावेत, यात्रा कालावधीत अवैध धंद्यांना आळा घालावा, अशा मागण्या केल्या.

यावर्षी संभाजीनगर व बीड येथून एसटी बसेस मागवून भाविकांची गैरसोय होऊ दिली जाणार नाही, असे आगारप्रमुख महेश कासार यांनी स्पष्ट केले, तर यात्रा कालावधीत जे उत्सव गडावर साजरे केले जातात, ते उत्सव देवस्थानच्या आजी-माजी विश्वस्तांना विश्वासात घेऊन पार पाडले जाईल, तसेच मुख्यद्वारसुद्धा सुरू करण्यात येईल, असे संजय मरकड यांनी स्पष्ट केले.