>> डॉ. दत्ता देशकर
नद्यांचे स्वास्थ्य जपणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे हे ओळखले पाहिजे. परंतु सध्या नद्या प्रदूषणाच्या भस्मासूराने पूर्णपणे वेढल्या आहेत. 14 मार्च रोजी जगभरात नदी संवर्धन दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने नद्या जगल्या तर आणि तरच आपण जगू शकू या संदेशाचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे.
आपण सर्वजण जलचक्राशी परिचित आहातच. समुद्राच्या पाण्याची उष्णतेमुळे वाफ होते, त्या वाफेचे ढग बनतात. ते ढग पृथ्वीतलाकडे सरकतात. ते जमिनीवर पाऊस पाडतात. पावसाचे पाणी उताराने वाहाते व शेवटी वाहात वाहात ते समुद्राला जाऊन मिळते, असे आपण भूगोल विषय शिकताना अभ्यासले होते. यालाच जलचक्र म्हणतात. हे चक्र पूर्ण करण्यासाठी नद्या बहुमोल कार्य करीत असतात. वाटेत त्या जनतेची तहान भागवतात. शेती, उद्योगांसाठी पाणी उपलब्ध करून देतात आणि उरलेले पाणी समुद्राला परत करून टाकतात. पण आजकाल वाटेतच इतके पाणी वापरले जाते की बहुतांश नद्या समुद्रापर्यंत पोहोचतच नाहीत असे दिसून येते. याचे प्रमुख कारण आहे माणसाचा पाण्याबद्दलचा हव्यास. निसर्गाने मानवाला ही जी नैसर्गिक संपत्ती दिली आहे ती सांभाळण्यासाठी दिली आहे. माणूस या संपत्तीचा विश्वस्त आहे. मागील पिढीपासून मिळालेली ही संपत्ती त्याला पुढील पिढीला हस्तांतरित करायची आहे. पण तो मात्र या संपत्तीचा मालक असल्यासारखा वागत आहे. हरीणही गवत खाते व गाढवही गवत खाते. पण दोघांच्या खाण्यात खूप फरक आहे. हरीण गवत खाताना गवताचे फक्त शेंडे खाते, मुळांना त्यामुळे कोणताही धोका पोहोचत नाही. ते सतत वाढतच राहते. पण गाढवाची गवत खाण्याची पद्धतच वेगळी आहे. ते मुळासकट गवत खाते. परिणामतः भविष्यात त्याला खाण्यासाठी गवतच उरत नाही. माणूस आजकाल गाढवासारखे वागायला लागला आहे. नैसर्गिक संपत्तीचा ओरबाडून खाण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.
आपल्याला अर्थ ओव्हरशूट डे ही संकल्पना माहीत आहे का? इतके दिवस वर्षभरात निसर्ग जेवढी संपत्ती निर्माण होत होती ती पूर्णपणे वापरली जात नव्हती. त्यामुळे काही संपत्ती शिलकीत राहात होती. पण हळूहळू यात बदल व्हायला लागला. माणूस वर्षभरात जेवढी संपत्ती निर्माण होते त्यापेक्षा जास्त संपत्ती वापरायला लागला आहे. ज्या दिवशी ती पूर्णपणे वापरली जाते, वापरली जाते त्या दिवसाला ‘अर्थ ओव्हरशूट डे’ म्हणतात. फार पूर्वी हा ‘ओव्हरशूट डे’ डिसेंबरच्या जवळपास घुटमळत होता. पण आता तो नोव्हेंबर, ऑक्टोबर, सप्टेंबर असा सरकत सरकत जुलैकडे वाटचाल करीत आहे. याचा अर्थ हा की जानेवारी ते डिसेंबरपर्यंत जी नैसर्गिक संपत्ती निर्माण होते ती आता जुलैमध्येच संपायला लागली आहे. 1921 मधील ‘अर्थ ओव्हरशूट डे’ कोणता होता माहीत आहे? तो होता 29 जुलै. बँकेत जेवढी रक्कम जमा होते तेवढीच आपण काढू शकतो. त्यापेक्षा जास्त रक्कम काढल्यास त्याला ओव्हरड्राफ्ट म्हणतात. असेच चालू राह्यले तर वाटचाल दिवाळखोरीकडे होत असते. निसर्गाच्याबाबतीत आपली स्थिती आता दिवाळखोरीकडे आपल्याला नेत आहे.
याचा परिणाम आता जाणवायला लागला आहे. इतके दिवस नद्या वर्षभर वाहात होत्या. पण आता पावसाळा संपताच बऱयाच नद्या कोरडय़ा पडायला लागल्या आहेत. त्यातील पाण्याचा उपसाही इतका वाढला आहे की नद्या शेवटपर्यंत पोहोचतच नाहीत. प्रत्येक नदी किनाऱयावर दोन्ही बाजूंना जैव विविधता अस्तित्वात असते. त्यात वनस्पती आणि कीटक यांच्या खूप साखळय़ा असतात. त्या एकमेकांना पूरक असतात. त्या मानवाला हितकारक असतात. त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पाणी आवश्यक ठरते. तेच नसेल तर या सर्व साखळ्यांचे अस्तित्वच धोक्यात येते. ज्या ठिकाणी नदी समुद्राला मिळते तिथे जो त्रिभूज प्रदेश असतो, तो या जैव विविधतेसाठी अत्यंत उपयोगी असतो. पण आज तिथपर्यंत पाणीच पोहोचत नसल्यामुळे या साखळ्यांचे अस्तित्वच अडचणीत आले आहे. नद्यांवर जेव्हा धरणे बांधायला सुरुवात झाली त्यावेळी पाण्याचा एक किमान प्रवाह तरी पुढे वाहता ठेवला जावा असे बोलले जात असे. पण या तत्त्वालाही आता तिलांजली मिळाली आहे.
नद्यांवरचे संकट एवढय़ावरच थांबत नाही. सध्या त्या प्रदूषणाच्या भस्मासुराने पूर्णपणे वेढल्या गेल्या आहेत. ज्या नद्यांचे पाणी आपण पितो त्या तरी शुद्ध ठेवाव्यात एवढेही तारमम्य माणसाला उरले नाही. पूर्वी नदीपात्रात डुंबायला मजा येत असे, पण आता नदीच्या काठावरही जाण्याची भीती वाटायला लागली आहे. तिथल्या दुर्गंधामुळे माणसाला एकही मिनीट तिथे उभे राहावेसे वाटत नाही. मग पात्रात उतरण्याची गोष्टच सोडा. नद्यांची ही अवस्था फक्त आपल्या देशातच आहे असे समजू नका. थोडय़ाफार फरकाने हेच चित्र जगातच सर्वत्र दिसत आहे. लंडनमधील थेम्स नदी याच अवस्थेतून गेली आहे. त्या नदीचे पाणी इतके प्रदूषित झाले होते की तिच्या काठावर असलेली लोकसभा दुर्गंधामुळे बरखास्त करावी लागली होती. पण तिथले लोक लवकरच सुधारले आणि खास प्रयत्न करून ती नदी आता इतकी स्वच्छ करण्यात आली आहे की लंडन शहराची ती शान बनली आहे.
ऋषिकेशची गंगा, हरिद्वारची गंगा आणि अलाहाबादची गंगा यात आपल्याला काही फरक जाणवतो का? ऋषिकेशला गंगा नदीचे पात्र बघताना मन कसे प्रसन्न होते. पण जेव्हा आपण अलाहाबादला येतो तिथे आता त्या पात्रात डुबकी मारण्याचीही इच्छा होत नाही. ऋषिकेश आणि अलाहाबाद या दोन शहरांमध्ये वाटेत कानपूर नावाचे शहर लागते. कानपूरचे वैशिष्टय़ म्हणजे तिथला चर्मउद्योग. त्या उद्योगाचे सांडपाणी सरळ नदीत सोडले जाते आणि त्यामुळे हा फरक जाणवतो. गेल्या कित्येक वर्षांपासून आपण गंगा शुद्धीकरण योजना राबवीत आहोत. पण म्हणावा तसा परिणाम आजही जाणवत नाही. गेल्या काही दिवसांपासून मात्र ती आता बरीच शुद्ध झाली आहे असा दावा करण्यात येत आहे.
मध्यंतरी जगात सर्वात जास्त प्रदूषित नदी कोणती याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून असे निष्पन्न झाले की, जगातील सर्वात प्रदूषित नदी पाकिस्तानमधील रावी नदी आहे. तिच्या खालोखाल बोलाव्हियातील पाझ नदी जास्त प्रदूषित आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला. तिसरा क्रमांक इथियोपियातील प्रणाली नदीचा लागतो. या तीनही नद्यांच्या काठावर राहणाऱया नागरिकांना हा धोक्याचा इशारा कळविण्यात आला आहे. दुःखात सुख इतकेच की आपल्या देशातील एकाही नदीचा नंबर या काळ्या यादीत लागलेला नाही. मित्रांनो, नद्यांना आपण आता शत्रू वाटायला लागलो आहोत. ज्या मार्गाने जमेल त्या मार्गाने आपण त्यांना प्रदूषित करायचे ठरविलेच असेल तर गोष्ट वेगळी. पण लक्षात ठेवा, नद्या जगल्या तर आणि तरच आपण जगू शकू. त्यामुळे नद्यांना आपण आपल्याला मिळालेली निसर्गाची भेट समजा आणि त्यांचे स्वास्थ्य जपणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे हे ओळखा.
(लेखक जलसंवाद मासिकचे संपादक आहेत)





























































