
>> कौस्तुभ खोरवाल
दोन देशातील युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने, चांदी यांचे भाव वाढतात. कारण युद्ध काळात देशातील अर्थव्यवस्था कोलमडून जाऊ नये म्हणून पैशाची साठवणूक अशा स्वरूपात तात्पुरती केली जाते. रशिया आणि युक्रेन या दोन देशातील युद्धामुळे हिंदुस्थानातील सोने आणि चांदीचा भाव चांगलाच वाढला आहे. याचबरोबर सध्या हिंदुस्थानसह अनेक देशातील औद्योगिक क्षेत्रावरही या युद्धाचा प्रभाव दिसून येत आहे. सध्या कच्च्या मालाच्या स्वरूपातील तांबे, पोलाद, क्रूड ऑईल इत्यादी गोष्टींची भाववाढदेखील औद्योगिक आणि पर्यायाने देशातील आर्थिक क्षेत्रावर परिणाम करत आहे. हे धोके युद्ध समाप्तीनंतर ते आटोक्यात येतील अशी आशा आहे.
प्रत्येक व्यक्तीला मन असते. तसेच व्यक्ती समूहाचेदेखील मन असते. त्याची स्पंदने आणि जाणिवा आर्थिक क्षेत्रात लगेच दिसून येतात. कमोडिटी मार्केटमध्ये मेटल (धातू), कृषी माल आणि काही विशेष रसायने यांचे आंतरराष्ट्रीय बाजारभावात सौदे होत असतात. जागतिकीकरणामुळे सर्व देश एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही देशाने युद्ध पुकारले तरीही सर्वच देशांची आर्थिक समीकरणे बदलतात.
आजच्या आधुनिक युगात प्रत्येक व्यक्ती, कंपनी आणि देश एकमेकांशी जोडलेले आहेत. आर्थिकदृष्टय़ा पाहिले तर तीनही स्तरात गुंतवणूक आणि आर्थिक जबाबदारी असते. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सर्व क्षेत्रातील प्रगतीदेखील महत्त्वाची असते. त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार योग्य ते निर्णय घेतच असतात, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीदेखील देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रशिया आणि युक्रेनमधील तुंबळ युद्ध. आपल्या देशापासून पाच हजार किलोमीटर लांब असलेल्या दोन देशांतील युद्धाने थेट आपल्या अर्थव्यवस्थेवर तात्पुरता दुष्परिणाम केला आहे.
दोन देशातील युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंचे भाव वाढतात. कारण युद्ध काळात देशातील अर्थव्यवस्था कोलमडून जाऊ नये म्हणून पैशाची साठवणूक सोने स्वरूपात तात्पुरती केली जाते. रशिया आणि युक्रेन या दोन देशातील युद्धामुळे हिंदुस्थानातील सोन्याचा भाव प्रति तोळे 55000 आणि चांदी प्रति किलो 71,000 पेक्षा अधिक झाला आहे. पूर्वीच्या काही युद्ध घटनांचा आढावा घेतल्यास तुम्हाला जाणवेल की, ही भाववाढ तात्पुरत्या स्वरूपातील असते. पहिल्या आखाती देशातील युद्धादरम्यान, जेव्हा इराकने 1990 मध्ये कुवेतवर आक्रमण केले होते; तेव्हा सोन्याच्या किमती वाढल्या होत्या, पण युद्ध संपल्यावर सोन्याचे भाव कमी होऊन आक्रमणापूर्वीच्या पातळीपर्यंत येऊन पोहोचले.
11 सप्टेंबर 2001 मध्ये अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सोन्याच्या किमती वाढल्या होत्या. तसेच 2003 मध्ये अमेरिकेने इराकवर केलेल्या हल्ल्यानंतरदेखील सोन्याच्या भावात वाढ झाली होती. साल 2014 मध्ये जेव्हा अमेरिका सीरियामध्ये हस्तक्षेप करू शकते; अशा अफवा सुरू झाल्या तेव्हादेखील सोन्याच्या किमतींवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. युद्ध काळात प्रत्येक देश स्वतःकडील पैशाची तात्पुरती साठवणूक सोने स्वरूपात करतो. अर्थशास्त्रातील नियमानुसार कुठल्याही वस्तूची मागणी ही पुरवठय़ापेक्षा किंवा उपलब्धतेपेक्षा वाढल्यास त्याच्या किमतीत वाढ होते.
युद्ध काळात प्रत्येक देशातील औद्योगिक क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम लगेच दिसून येतो. कारण कच्चा मालाच्या स्वरूपात तांबे, पोलाद, क्रूड ऑईल इत्यादी गोष्टींची किंचित भाववाढदेखील कंपनीच्या नफ्यात घट निर्माण करते. या अचानक निर्माण होणाऱया धोक्यांची तीव्रता युद्ध समाप्तीनंतर आटोक्यात येते. व्यक्तिगत स्तरावर पाहिल्यास सामान्य माणसाचे महिन्याचे बजेट खाद्य तेलाचे वाढणारे भाव पाहूनच कोलमडून जाते. जिथे पैशाची बचत होण्याची लक्षणे दिसत नाहीत; तेथे नवीन गुंतवणूकबाबत काय बोलावे?
आपण सर्वांनी कोरोना काळातील दीर्घकाळ चाललेले वाईट दिवस अनुभवले आहेत. राज्यस्तरावर विचार केल्यास आपल्याला या संपूर्ण काळात अन्नधान्याचा तुटवडा कधीही भासला नाही. पण कुठलीही वस्तू किंवा सेवा घेण्यासाठी पैसे लागतात. त्याची सोय आपल्यालाच करावी लागते. ही अनिश्चितता कोणालाही चुकली नाही. या सर्व घटनांचा विचार केल्यावर एक गोष्ट ध्यानात येते; आपल्याला मासिक उत्पन्न देणाऱया गुंतवणूक योजनांचा विचार निश्चित केला पाहिजे. मागील वर्षभरातील भारतीय शेअर बाजारातील परतावा पाहून लाखो गुंतवणूकदारांचे डोळे दिपून गेले. त्यामुळे बँक ठेवीवरील चार-पाच टक्के दर कमी वाटू लागला.
अनिश्चित परतावा देणाऱया कुठल्याही गुंतवणूक योजनेत अधिक परतावा मिळण्याचे एकच सूत्र आहे; दीर्घकाळ खंडाखंडाने पैशाची गुंतवणूक करणे, आंतरराष्ट्रीय स्तरातून भारतीय शेअर बाजारातील प्रगतीचे आणि पारदर्शक व्यवहारांचे कौतुक होते. त्यामुळे म्युच्युअल फंड आणि शेअर्स (कंपनीचे समभाग) मधील दीर्घकाळ गुंतवणूक निश्चितच फायद्याची आहे. पैशाची बचत करण्यात हिंदुस्थानी नागरिक अग्रेसर असतात, पण गुंतवणूकबाबत तेवढी जागरूकता दिसत नाही. कमी कालावधीत अधिक परतावा देणाऱया गुंतवणूक योजनांकडे लोकांचा कल अधिक असतो. सध्याच्या काळात स्वतःची मानसिकता ओळखून गुंतवणूक पर्याय निवडणे अधिक सोयीचे राहील.
आर्थिक साक्षरता प्रमाण वाढत असल्यामुळे अस्थिर परताव्याबाबत भीती न बाळगता शेअर्स, सोने आणि चांदीमधील गुंतवणूक प्रत्येक गुंतवणूकदाराच्या डिमॅट खात्यात जमा होत आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील गुंतवणूक व्यक्तीला चिंतामुक्त ठेवते. युद्धाचे प्रसंग वाईट परिणाम करतात; तसेच काही चांगल्या घटना व्यक्ती, कंपन्या आणि देश स्तरावर दिसून येतात. उदाहरण द्यायचे झाल्यास नुकतेच टाटा समूहाने हाती घेतलेल्या एअर इंडिया कंपनीने युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या हजारो हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना युद्ध काळात मायदेशी परत आणले. तसेच रशियन तेल कंपन्यांनी हिंदुस्थानीला क्रूड ऑईलमधील किमतीत 25 टक्क्यांपर्यंत सूट देण्याबद्दलच्या प्रस्तावाची माहिती समोर येत आहे. येणाऱया काळात हा प्रस्ताव मंजूर झाल्यास हिंदुस्थानातील औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्राला विशेष बळ प्राप्त होईल.
(लेखक प्राध्यापक आणि आर्थिक सल्लागार आहेत.)






























































