पोहेगावात बिबट्याचा धुमाकूळ; कुत्रे शेळ्यांसह बोकडाचा फडशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव शिवारात चौधरी वस्तीवर मध्यरात्री बारा वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने धुमाकूळ घालत कुत्री शेळया व बोकड फडशा पाडल्याने. शेतकरी काळजीत पडले आहेत. शिवारात उंच वाढलेल्या गवतात बिबट्यांचा मुक्काम असल्याने शेतकरी जनावरे चरण्यास नेताना घाबरत आहेत.

चौधरी वस्तीवरील अण्णासाहेब विश्वनाथ चौधरी यांच्या वस्तीवर अचानक बिबट्याने मध्यरात्री हल्ला केला. भिमाबाई विश्वनाथ चौधरी यांची शेळी या बिबट्याने ठार केली. तर परिसरातील तुकाराम जाधव यांचा बोकड्या योगेश माळी यांची शेळी व अनेक कुत्रे या बिबट्याने ठार केले असल्याची घटना पोहेगाव परिसरात घडली आहे.

अण्णासाहेब चौधरी यांच्या गोठ्यामध्ये मध्यरात्री बिबट्याने हल्ला चढवला असता त्यांचे पाळीव कुत्रे भुंकायला लागले. कुत्रे का भुकंतात म्हणून चौधरी जागे झाले तर डोळ्यासमोरून बिबट्या शेळी घेऊन जात असताना त्यांच्या लक्षात आला. त्यांनी प्रसंगावधान दाखवत शेजारी राहत असलेल्या प्रकाश पानगव्हाणे, सुभाष चौधरी, संजय माळी यांना याबाबत भ्रमणध्वनीवरून कल्पना दिली. चौधरी यांच्या मदतीला ते धावून आले.

गेल्या दोन महिन्यापासून या परिसरात बिबट्याची दहशत असल्यामुळे वाड्या वस्त्यांवरील नागरिकांनी बिबट्याला पळवून लावण्यासाठी घरामध्ये फटाके आणून ठेवले होते. तेच फटाके त्यांनी मध्यरात्री वाजवले. मग मात्र बिबट्या तेथून पळाला. सदर घटनेची माहिती चौधरी यांनी देवेंद्र रोहमारे यांना दिली. रोहमारे यांनी वनविभागाशी संपर्क साधत या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. चौधरी यांच्या शेळीचा महसूल विभागाच्या वतीने तलाठी कदम यांनी पंचनामा केला आहे. मात्र या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने त्वरित या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

मुर्शतपुर परिसरात बिबट्या
कोपरगाव मुर्शतपुर परिसरातील कोळपेवाडी कोपरगाव या वर्दळीच्या रस्त्यावर बिबट्याने दर्शन दिल्याने खळबळ उडाली आहे. परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.