
>>दिलीप देशपांडे
होलिका ही वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही वाईट पद्धतीनेच झाला. त्यामुळेच वाईट आचार-विचारांना बाजूला सारणे, मनातील वाईट विचार होळीप्रमाणे अग्नीत जाळून राख करणे, हाच होळी साजरा करणे यामागचा उद्देश आहे. याच दिवशी वाईट विचारांचा व वाईट गोष्टींचा त्याग केला पाहिजे.
आपल्याकडे नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला होते, मग रामनवमी, अक्षय तृतीया, गणपती, दुर्गा उत्सव-नवरात्र (दसरा), दिवाळी (वसुबारस, पाडवा, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज.) आणि शेवटचा सण तो होळीचा सण असतो. फाल्गुन पौर्णिमेला आपण होळी सण साजरा करत असतो. त्यालाच हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात. होळीचा, उत्सव, ‘होलिकोत्सव’ म्हणतात. आपल्याकडे होळीला ‘शिमगा’ असेही म्हणतात. तसेच होरी हा शब्द म्हणतात.
वसंत ऋतूचे आगमन झालेले असते. वातावरणात, नैसर्गिक बदल झाला असतो. थंडी संपून, ऊन तापायला सुरुवात झाली असते. उन्हाळ्याची चाहुल लागते. पानगळ सुरू झाली असते.
उत्तर हिंदुस्थान, दक्षिण हिंदुस्थान, महाराष्ट्रात होळीचा सण हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो.
कोकणात होळीचा उत्सव मोठा असतो. विशेष रत्नागिरी जिह्यात जास्त. तिकडे शिमगा असेही म्हणतात. कोकणात हा सण 5 ते 15 दिवस असतो. होळीचा हा मुख्य दिवस असतो. ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावण्याचा मान असतो व त्यातील निखारा घेऊन मग गावातील ठिकठिकाणी होळी पेटवली जाते. होळी पौर्णिमा, धुळवड, आणि रंगपंचमी असा हा सण साजरा केला जातो. होळी हा रंगांचा सण समजला जातो. तसेच एकमेकांना रंग लावून रंगपंचमी साजरी केली जाते. तसेच पारंपरिक नृत्य, पारंपरिक गाणी यामध्ये साजरी केली जातात. वंजारी समाजात होळीला फार महत्त्व आहे. पारंपरिक पोषाख घालून नृत्य करण्याची प्रथा आहे.
मध्य प्रदेशात इंदूर, उत्तर प्रदेशात मथुरा, वृंदावन, नंदगावला होळी विशेष साजरी होते. प्रत्येक ठिकाणच्या आख्यायिका वेगवेगळ्या सांगितल्या जातात.
पूर्वी गावातील प्रमुख चौकात नगारखान्यात होळी पेटवली जात होती. आताही गावातील प्रमुख चौकांच्याबरोबरीने निरनिराळ्या कॉलन्यांतून होळी पेटवली जाते. एका खड्डय़ात एरंडाची उंच फांदी रोवून आजूबाजूला शेणाच्या गोवऱया रचतात. लाकूड, झाडाच्या वाळलेल्या फांद्या रचतात. हार घालतात. मुख्य होळी पेटवली की तिथून मशाल पेटवून इतर होळी पेटवितात. असा प्रघात आहे.
एकमेकांशी वैर, राग असेल तो होळीत टाकून संबंध सुधारावेत ही भावना असते. होळीच्या दुसऱया दिवशी धूलिवंदन-धुळवड साजरी करतात. तर पाचव्या दिवशी ‘रंगपंचमी’ साजरी करतात. सर्वत्र भेदभाव, भांडणे, वैर विसरून रंगांची उधळण करतात. पावरा लोकात हा सण मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. बंजारी समाजातही होळी उत्साहाने साजरी होते.
रंगांची उधळण करत असताना तो रंग अपायकारक नसावा, तसेच कोणालाही इच्छेविरुद्ध रंगवू नये. मद्य प्राशन करू नये. या सर्व गोष्टीचे भान ठेवणे महत्त्वाचे आहे.
होलिका ही वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही वाईट पद्धतीनेच झाला. त्यामुळेच वाईट आचार-विचारांना बाजूला सारणे संपवणे, मनातील वाईट विचार होळीप्रमाणे अग्नीत जाळून राख करणे, हाच होळी साजरा करणे यामागचा उद्देश आहे. याच दिवशी वाईट विचारांचा व वाईट गोष्टींचा त्याग केला पाहिजे.


























































