
गोवर्धन कंपनीच्या दुधात अशुद्ध पाणी मिक्स करून भेसळयुक्त दूध पुन्हा गोवर्धन कंपनीच्या नावाने विकण्याचा बोगस कारभार आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेने उद्ध्वस्त केला. पहाटेच्या वेळेस वाकोला येथे ही कारवाई करण्यात आली.
वाकोला येथील लोखंडवाला चाळीतील खोली क्रमांक 32 मध्ये दुधाचा काळाबाजार केला जात असल्याची खबर सी. बी. कंट्रोल युनिटला मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक नितीन पाटील यांच्यासह पोलीस पथकाने एफडीएच्या पथकासह त्या ठिकाणी पहाटेच्या वेळेस छापा टाकला. तेव्हा त्या खोलीत नागराज मेडाबोयाना (26) हा तरुण गोवर्धन दुधाच्या पिशवीतील चांगले दूध काढून त्यात अशुद्ध पाणी भरताना रंगेहाथ सापडला. त्या खोलीत 570 लिटर गोवर्धन दूध, स्टीलची प्लेट, ग्लास, स्टोव्ह पिन, ब्लेड, दुधाच्या रिकाम्या पिशव्या असे साहित्य सापडले. एफडीएच्या पथकाने दुधाचे नमुने घेऊन उर्वरित भेसळयुक्त दूध फेकून दिले. पुढील कारवाईसाठी नागराजला वाकोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

























































