
‘छत्रपती शाहू संशोधन, प्रशिक्षण आणि मानवविकास संस्था’ (सारथी) या संस्थेला महाविकास आघाडी सरकारकडून कोल्हापूर शहरात दोन हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.
कंपनी कायदा-2013अंतर्गत ‘सारथी’ ही स्थापन झालेली नोंदणीकृत संस्था आहे. या संस्थेला वसतिगृहे, तसेच अशा प्रकारच्या इतर उपक्रमांसाठी कोल्हापूर शहरात दोन हेक्टर जमीन मिळण्याचा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांनी शासनाला सादर केला आहे. यासंदर्भात ‘सारथी’ संस्थेची मागणी, विविध प्रयोजने, किमान जागेची आवश्यकता आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-1966 व महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम-1971मधील तरतुदींनुसार या संस्थेला जागा प्रदान करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
यानुसार ‘सारथी’ संस्थेला उपकेंद्र व विभागीय मुख्यालय, कोल्हापूर, तसेच मुला-मुलींना वेगवेगळी वसतिगृहे व इतर संबंधित बाबींसाठी शहरात रि.स.नं. 374, 375, 376, 377 व 378मधील आरक्षण वगळून वाटपास उपलब्ध असलेल्या मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहांसाठी व इतर प्रस्तावित वापरासाठी प्रत्येकी 0.80 हे.आर. असे एकूण 1.60 हे.आर. क्षेत्र व रस्त्यासाठी रि.स.नं. 374/2/2, 375 व 376/1मधील 25 आर. क्षेत्र नियोजन विभागाला जमीनवाटपाबाबतच्या नियमित अटी व शर्तींनुसार महसूलमुक्त व भोगवटा मूल्यरहित किमतीने प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे बांधकाम व संचालनाचे काम ‘सारथी’मार्फत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱयांनी स्वतंत्र जागा प्रस्तावित केली आहे. त्यामुळे येथील खंडपीठाचे आरक्षण वगळण्याबाबत मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशांनुसार नगरविकास विभागाने कार्यवाही करावी, अशी सूचना देण्यात आली आहे.
























































