जीवशास्त्रातील बहुपर्यायी प्रश्नांचे दहा गुण गोत्यात, उत्तर बरोबर असूनही लिहिण्याची पद्धत चुकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर बरोबर असूनही ते लिहिण्याची पद्धत चुकीची असल्याने बारावी सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्नांसाठी असलेले 10 गुण गमवावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जीवशास्त्र्ााच्या परीक्षेत पहिल्या प्रश्नात 10 गुणांचे एमसीक्यू प्रश्न (बहुपर्यायी प्रश्न) विचारण्यात आले होते. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना विद्यार्थ्यांनी केवळ पर्याय लिहिला असल्यास (a,b,c किंवा d यांपैकी एक) अथवा फक्त उत्तर लिहिले असल्यास तसेच पूर्ण वाक्यात उत्तर लिहून त्यात पर्याय (a,b,c किंवा d यांपैकी एक) न लिहिल्यास शून्य गुण देण्याच्या सूचना परीक्षक आणि नियामकांना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षांना सामोरे जाणाऱया विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्युनियर कॉलेजमध्ये हजेरी लावून अभ्यास करण्यास फारच कमी वेळ मिळाला. त्यामुळे यंदा पेपर तपासताना कठोर होऊ नये, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियामकांच्या बैठकीत दिल्या होत्या. मात्र जीवशास्त्र्ा विषयाच्या मुख्य नियामकांनी घेतलेल्या बैठकीत बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे लिहिताना विद्यार्थ्यांची पद्धत चुकीची असल्यास गुण न देण्याच्या सूचना परीक्षकांना दिल्या आहेत. त्यामुळे नेमके काय करावे, असा प्रश्न परीक्षक आणि नियामकांसमोर आहे. याउलट रसायनशास्त्र्ा आणि भौतिकशास्त्र्ा विषयांच्या परीक्षेत विचारण्यात आलेल्या बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तराबाबत अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.

आदर्श उत्तरपत्रिकेबाबत आधीच अवगत करावे

बारावीचे विद्यार्थी वर्षभर बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करीत असतात. ज्युनियर कॉलेज स्तरावर विविध प्रश्नसंच सोडवून घेण्यात येतात. त्या वेळी आदर्श उत्तरपत्रिका कशी असावी, याविषयी विद्यार्थ्यांना अवगत करणे आवश्यक असल्याचे मत बारावीच्या शिक्षकांनी व्यक्त केले. जीवशास्त्र्ााच्या उत्तरपत्रिकेत बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे लिहिताना ती कोणत्या पद्धतीत असावी, याविषयी काही कॉलेजमधून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय विद्यार्थी जेव्हा पूर्ण वाक्यात उत्तर लिहितात त्यावेळी त्या वाक्याच्या मध्येच योग्य पर्याय लिहिणे म्हणजेच (a,b,c किंवा d) योग्य ठरेल का, असा सवालही शिक्षकांनी उपस्थित केला.

मुख्य नियामकांच्या बैठकीत पेपर तपासणीबाबत दिलेल्या सूचनांनुसार उत्तरपत्रिका तपासल्या जातात. शिवाय ही गोपनीय बाब असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.