
बेताची परिस्थिती… माफक जमीन… शेतकरी कुटूंबात जन्म.. असे असून सुद्धा जिद्द, चिकाटी, अपार मेहनत या जोरावर चोरे (ता. कराड) येथील अक्षय जगंनाथ साळुंखे याने एमपीएससी परीक्षेमध्ये उज्वल यश मिळवले आहे. अक्ष याने राज्य लोकसेवा आयोगाची मोटार वाहन उपनिरीक्षक परीक्षा देऊन राज्यात दुसरा क्रमांक पटकावला.
शालेय जीवनापासून अक्षयला शिक्षणाची आवड होती. अगदी शाळेपासून तो वेगवेगळ्या परीक्षा द्यायचा. उच्च शिक्षणासाठी नंतर कोकणात गेला. तेथे पदवी घेतली. तेथून त्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत भाग घेण्याची आवड निर्माण झाली. गावी आला तरी सोबत अभ्यासक्रमाची पुस्तके असायची. दुर्गम भागात असून काहीतरी वेगळं बनण्याची जिद्द अक्षयने मनी बाळगली होती. त्याच्या रूपाने गावात पहिला एमपीएसएसी उत्तीर्ण होण्याचा मान त्याने पटकाविला.
वडील शेतकरी, आई गृहिणी असा कोणताही शैक्षणिक वारसा नसताना अक्षयने रात्रंदिवस अभ्यास करून ध्येय गाठले. कराड, सातारा, पुणे अशा ठिकाणी जाऊन मार्गदर्शन घेतले. आई-वडिलांचे आशीर्वाद, घरच्या लोकांचा व मित्रमंडळी यांचे पाठबळ या जोरावर त्याने हे यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल गावातील ग्रामस्थ, मित्रमंडळी त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक यांनी अभिनंदन केले.
























































