भाजप कश्मिरी पंडितांची माफी मागणार का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशुतोष शिर्के

पंतप्रधान मोदींपासून भाजप आणि पूर्ण संघ परिवार सध्या ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या समर्थनार्थ उतरला आहे. कश्मिरी पंडितांच्या विस्थापनाला भाजप सोडून इतर कसे जबाबदार आहेत याचा प्रचार केला जात आहे. मात्र वास्तवात भाजपच कश्मिरी पंडितांचा खरा गुन्हेगार म्हणायला हवा.

‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या किती तरी आधी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या हातून घडलेल्या या गंभीर गुन्ह्याबद्दल कश्मिरी पंडितांची माफी मागायला हवी होती. ती त्यांनी कधीच मागितली नाही. कश्मिरी पंडितांबद्दल किमान संवेदनशीलताही भाजपने दाखवली नाही आणि आता तर ‘कश्मीर फाईल्स’ प्रदर्शित झाल्यावर पंडितांचा आणखी एक गंभीर गुन्हा त्यांनी केला आहे. हा गुन्हा अक्षम्य आहे. प्रश्न असा आहे की, गुन्हा जरी अक्षम्य असला तरी भाजप आणि पंतप्रधान मोदींनी कश्मिरी पंडितांची जाहीर माफी मागितली पाहिजे हा आग्रह आपण धरणार आहोत की नाही?

समाजातील एका घटकाला लक्ष्य करून त्यांच्यावर मोठा अन्याय, अत्याचार झाला असेल, तर सर्वात प्रथम एक प्रश्न विचारला जायला हवा. अत्याचाराचे बळी कोणीही असोत. कश्मिरी पंडित असोत, शीख असोत, मुस्लिम असोत, ख्रिश्चन असोत किंवा दलित असोत. सर्वप्रथम प्रश्न विचारायला जायला हवा तो असा की, हे अत्याचार थांबवण्याची जबाबदारी आणि क्षमता ज्यांची होती त्यांनी ही जबाबदारी का पाळली नाही? हा प्रश्न या सिनेमात विचारला गेला आहे का? दुर्दैवाने त्याचे उत्तर नाही असे येते आणि इथेच या सिनेमाच्या निर्मात्यांबद्दल आणि त्याचे प्रमोशन करणाऱया पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाबद्दल गंभीर नैतिक प्रश्न निर्माण होतात.

 कश्मिरी पंडितांना वाचवण्याची जबाबदारी आणि क्षमता कोणाची होती या प्रश्नाला सिनेमात स्पर्शदेखील का नाही करण्यात आला? कारण कश्मिरी पंडितांना संरक्षण देण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पक्षाची होती. कारण हा पक्ष त्यावेळी विरोधी पक्षात नव्हता, तर सत्तेत होता. विरोधी पक्षात काँग्रेस पक्ष होता. भाजप सत्तेत अशा अर्थाने होता की, काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी व्ही. पी. सिंग यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. आणि ज्या क्षणी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेईल त्याक्षणी सरकार पडणार अशी अवस्था होती. भाजपकडे केंद्र सरकारच्या सर्व नाडय़ा होत्या. इतकेच नाही, त्या वेळेस भाजपला अतिशय प्रिय असलेले जगमोहन हे कश्मीरचे राज्यपाल होते. याही पुढे जाऊन असे म्हणता येते की, जगमोहन यांच्याकडे कश्मीरचे पोलीस आणि सर्व प्रशासनावर अनिर्बंध अशी सत्ता होती. तरीही पंडितांना संरक्षण का नाही देण्यात आले? ऐतिहासिक सत्य हेच आहे की, भाजप पंडितांवरील अन्याय थांबवू शकला नाही. भाजपने केंद्र सरकारचा पाठिंबा का काढला नाही? सैन्य पाठवून पंडितांना संरक्षण द्या नाही तर आम्ही तुमचा पाठिंबा काढून सरकार पाडू, अशी साधी धमकीदेखील भाजपने दिली नाही. इतकेच नाही तर कश्मीरमधील परिस्थितीबद्दल केंद्र सरकारचा विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांनी संसदेला जो घेराव घातला त्यामध्येदेखील भाजप सामील झाला नाही. कश्मीरमधील पंडितांचे विस्थापन भारतीय जनता पक्ष डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखा शांतपणे पाहात राहिला. हे यांचे कश्मीरच्या पंडितांबद्दलचे प्रेम!

इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपचे लोक असा प्रश्न उपस्थित करतात की, आम्ही असमर्थ होतो. कारण पंडितांचे कश्मीरमधून विस्थापन तर शंभर वर्षे चालू आहे. हा युक्तिवाद लबाडीचा आहे. सिनेमा तर फक्त भाजप आणि जगमोहन सत्तेवर असतानाच्या काळातील विस्थापनावर आहे ना? मग त्या वेळची त्यांची (बे)जबाबदारी आणि असंवेदनशीलता सिनेमात दाखवायला नको? आणि हाच तर्क वापरायचा झाला तर एखाद्या ठिकाणी दलितांवर अत्याचार झाला तर तेथील सरकारची काहीच जबाबदारी नाही? कारण दलितांवर अत्याचार तर हजारो वर्षांपासून होत आले आहेत.

आणखी एक युक्तिवाद संघ आणि भाजपच्या समर्थकांकडून करण्यात येतो. तो असा की त्या वेळेस जर व्ही. पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढला असता तर देशात राजकीय अस्थैर्य निर्माण झाले असते. हे विधान तर हतबुद्ध करणारे आहे. कारण कश्मिरी पंडितांची हकालपट्टी झाल्यानंतर थोडय़ाच दिवसांत लालकृष्ण आडवाणींची रथयात्रा अडवली म्हणून भाजपने व्ही. पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पाडले. तेव्हा नाही राजकीय अस्थैर्याची चिंता वाटली? रथयात्रा अडवण्यामुळे एवढे व्यथित होता की तुम्हाला केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा असे वाटले, पण कश्मिरी पंडितांची ससेहोलपट मात्र तुम्हाला व्यथित करत नाही? का अशी रणनीती होती तुमची की पंडितांचे विस्थापन होऊ द्यावे आणि मग नंतर त्याचा कायमचा राजकीय मुद्दा करावा? तोपर्यंत लोकही तेव्हा सत्तेवर कोण होते हे पूर्णपणे विसरलेले असतील.

खरे तर या मुद्दय़ावर भाजपच्या वतीने पंतप्रधानांनी कश्मिरी पंडितांची आणि देशाचीही माफी मागायला हवी. दुसरा तितकाच गंभीर मुद्दा आहे. या सिनेमात पंडितांव्यतिरिक्त इतर धर्माच्या लोकांच्या याच काळात मोठय़ा प्रमाणावर हत्या झाल्या हे सत्य दाखवलेले नाही. कारण हे सत्य दाखवले असते तर मग पाकिस्तानलादेखील पंडितांवरील हत्येला जबाबदार धरावे लागले असते. कारण पाकपुरस्कृत अतिरेक्यांनी कश्मीरमध्ये सर्वधर्माच्या लोकांना ठार केले आहे. हे सर्व आज कश्मिरी पंडितच सांगत आहेत. परंतु हा भाग पुढे आणला असता तर मग हिंदुस्थानी समाजात दुही पसरवण्याचे राजकारण भाजपला या सिनेमाच्या निमित्ताने करता आले नसते. म्हणून सिनेमात पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल फारसे भाष्यच नाही.
1990 पासून आजपर्यंत 13 वर्षे सरकार असूनही भाजपने कश्मिरी पंडितांची कशी परवड केली हे तर अनेक कश्मिरी पंडितांनी सांगितले आहे. या दोन्ही गंभीर गुह्यांबद्दल पंतप्रधान मोदींनी भाजपच्या वतीने कश्मिरी पंडितांची आणि हिंदुस्थानी जनतेची माफी मागायला हवी. ही मागणी घेऊन सबंध देशभर आंदोलन उभे राहायला हवे. देशाबद्दल, कश्मीरबद्दल खरे प्रेम असणाऱ्या सर्वांनी यात सहभागी व्हायला हवे. हीच खरी राष्ट्रभक्ती, हाच खरा राष्ट्रवाद! अन्यथा कश्मिरी पंडितांचे अश्रू खऱ्या अर्थाने पुसले जाणार नाहीत.

‘द कश्मीर फाईल्स’ हा सिनेमा पंडितांवरील अन्यायामुळे प्रेरित होऊन वगैरे अजिबात करण्यात आलेला नाही. सरळ-सरळ समाजात दुही निर्माण करून भाजपला येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा फायदा व्हावा म्हणून तयार करण्यात आला आहे. या सिनेमात भाजपची आणि जगमोहन यांची (बे)जबाबदारी दाखवली असती तर पंतप्रधान सिनेमा पाहायला गेले असते का? त्यांनी या सिनेमाची स्तुती केली असती का? भाजप सिनेमाला डोक्यावर घेऊन नाचला असता का? इथेच या पक्षाचे कश्मिरी पंडितांवरील ‘बनावट’ प्रेम दिसून येते.