पारनेर तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून सिद्ध करा, गुलाबराव पाटील यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना केवळ पक्ष अथवा संघटना नसून, तो एक विचार आहे. शिवसेनेला संघर्षाचा वारसा आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पारनेर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करा, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

अळकुटी येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. विखे यांचे निकटवर्तीय डॉ. भास्कर शिरोळे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार विजय औटी, संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, बांधकाम सभापती काशिनाथ दाते, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, सभापती गणेश शेळके, तालुकाप्रमुख विकास रोहोकले, डॉ. श्रीकांत पठारे, प्रियंका खिलारी, सरपंच डॉ. कोमल भंडारी, सुनीता मुळे, युवराज पठारे, युवराज पाटील, राजू शेख, भाऊ ठुबे, नितीन औटी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, शिवसेनाप्रमुखांच्या ज्वलंत विचारांचा वारसा शिवसेनेला आणि शिवसैनिकांना लाभला आहे. आमदार, खासदार आमचे नसले तरी मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, त्यामुळे डगमगण्याचे कारणही नाही. पारनेर तालुक्यातील 46 गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी निकषात बसणाऱया 24 पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिल्याचेही ते म्हणाले.

शंकरराव गडाख म्हणाले, ‘पारनेर तालुक्याच्या विविध गावांतील 162 पाझर तलावांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यापैकी काही पाझर तलावांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पारनेरसारख्या दुष्काळी तालुक्यासाठी पाझर तलावांची गळती थांबवणे व त्यातून सिंचन क्षेत्रात वाढ करणे हे फार मोठे काम आहे. शिवसेनेने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचली पाहिजेत. ते काम शिवसैनिकांनी तळमळीने करावे, असे आवाहनही त्यांनी केले.