अंगडिया खंडणी प्रकरण – सौरभ त्रिपाठी यांचा अटकपूर्व जामिन फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंगडिया खंडणी प्रकरणातील आरोपी निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळण्यात आला आहे. बचाव पक्षाचा युक्तीवाद सोमवारी पूर्ण झाला. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी आपला युक्तीवाद केला. यावर आज बुधवारी सुनावणी झाली.

अंगडिया खंडणी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेचे निलंबित उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचा शोध घेतला जात आहे तर अटकेपासून संरक्षण व्हावे, यासाठी सौरभ त्रिपाठी यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्रिपाठी यांच्यातर्फे ऍड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला. निकम यांचा युक्तिवाद झाल्यानंतर पोलिसांनी आपली बाजू मांडली.

दरम्यान, अंगडिया खंडणी प्रकरणात पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालाची एक प्रत देण्यात यावी अशी मागणी निकम यांनी कोर्टाकडे केली. मात्र अजून तपास करणे बाकी असल्याने प्राथमिक चौकशी अहवाल देण्यास पोलिसांनी स्पष्ट नकार दिला.

काय आहे प्रकरण?

भुलेश्वर येथील पोफळवाडीतील अंगडियांना आयकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवत लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या तिघा अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळली होती. याप्रकरणी अंगडियांनी तक्रार केल्यानंतर अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी चौकशी केली असता तक्रारीत तथ्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तिघा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल होताच त्या परिमंडळाचे तत्कालीन उपायुक्त सौरभ त्रिपाठी हे वरिष्ठांची कोणतीही परवानगी न घेता तडकाफडकी रजेवर गेले. दरम्यान, त्रिपाठी यांची परिमंडळ 2वरून उपायुक्त अभियानपदी बदली केली होती. पण त्रिपाठी तेथे अद्याप हजर झालेच नाही.

निलंबनाची कारवाई

गुन्हा दाखल होऊन तसेच संबंधित अधिकाऱयांना अटक होऊन महिना लोटला तरी त्रिपाठी कामावर रुजू झाले नाहीत. असे असतानाच पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खंडणी उकळल्याची तक्रार करणाऱ्यां अंगडिया असोसिएशनच्या काही सदस्यांवर त्रिपाठी दबाव टाकत होते. ही गंभीर बाब समोर आल्यानंतर त्रिपाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव मुंबई पोलिसांनी राज्य शासनाकडे पाठवला होता. राज्य शासनाने या प्रस्तावाची गंभीर दखल घेत कामावर गैरहजर राहणारे व अंगडिया असोसिएशनच्या काही सदस्यांवर दबाव टाकणारे सौरभ त्रिपाठी यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली..