मुलाची तहान भागविण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडून ऊसतोड मजूर महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

मुलाची तहान भागविण्यास गेलेल्या ऊसतोड महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची वेदनादायक घटना सातारा तालुक्यातील फडतरवाडी येथे घडली. स्वाती सुनील अंभोरे (वय 26, रा. फडतरवाडी, मूळ रा. बिबी, ता. शिवली, जि. जालना) असे या माउलीचे नाव आहे.

फडतरवाडीतील दरे नावाच्या शिवारात ऊसतोड सुरू आहे. या ठिकाणी जालन्यातील मजूर काम करीत आहेत. यावेळी स्वाती हिचा मुलगा आशिष याला तहान लागली. त्यामुळे जवळच विहीर असल्याने ही महिला पाणी आणण्यासाठी विहिरीजवळ गेली. त्या विहिरीला पायऱया नसल्यामुळे स्वाती अंभोरे यांनी बादलीला दोरी बांधून बादली विहिरीत टाकली. त्यावेळी त्यांचा अचानक पाय घसरून त्या विहिरीत पडल्या.

बराचवेळ झाला तरी त्या परत आल्या नाहीत म्हणून पती सुनील अंभोरे हे विहिरीवर गेले. तेव्हा त्यांना स्वाती यांची चप्पल व घागर विहिरीच्या काठाला पडलेली दिसली, तर बादली दोरीसह पाण्यावर तरंगत होती. नक्कीच काहीतरी विपरीत घडल्याची जाणीव सुनील अंभोरे यांना झाल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर त्यांनी विहिरीत उडी मारून स्वातीचा शोध घेतला. मात्र, त्या सापडल्या नाही. काही वेळानंतर इतर मजूर त्या ठिकाणी आले. त्यांनीही विहिरीत उतरून शोध घेतला असता स्वाती यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. अशाप्रकारे मुलाची तहान भागविताना आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ऊसतोड मजुरांमधून हळहळ व्यक्त होत आहे.