गुंडगिरीने देशाची प्रगती करू शकणार नाही! केजरीवाल यांचा भाजपला सडेतोड उत्तर, ‘आप’ कोर्टात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arvind-kejriwal-punjab

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकारण तापले आहे. या हल्ल्यावरून आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आता या घटनेवर मुख्यमंत्री केजरीवाल यांचीही प्रतिक्रिया आली आहे. ‘केजरीवालांवर हल्ला याला फारसे महत्त्व नाही’, असे त्यांनी म्हटले आहे. ‘मी खूप छोटा माणूस आहे. देशासाठी प्राण द्यायलाही तयार आहे, पण अशा गुंडगिरीने देशाची प्रगती होत नाही’, असे म्हणत त्यांनी भाजपला इशाराही दिला आहे.

केजरीवाल म्हणाले की, ’21व्या शतकातील हिंदुस्थानसाठी आपल्याला प्रेमाने आणि प्रेमानेच काम करावे लागेल. मारहाण आणि गुंडगिरीत 75 वर्षे वाया गेली’. भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, ‘देशाच्या सत्ताधारी पक्षाने राजधानीत गुंडगिरी केली तर तरुणांमध्ये काय संदेश जाईल?’

या प्रकरणी आता आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांवर आरोप आहे की काल पोलिसांनी ‘भाजप गुंडांना’ रोखण्यासाठी काही उपाय केले नाही आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर सहज जाऊ दिले. याचिकेत सौरभ भारद्वाज यांनी कालच्या निदर्शनाला अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ला असे वर्णन केले असून काल हा हल्ला केजरीवाल यांच्या घराबाहेर करण्यात आल्याचे लिहिले आहे. यासोबतच कलम 226 अंतर्गत दिल्ली पोलिसांवर एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. काल घडलेल्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणारी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्याची चर्चा आहे.