लेख – भरड धान्यांचा वापर वाढवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पद्मश्री अशोक भगत

आपण ज्याला भरड धान्य म्हणतो, ते सामान्यतः गरीब लोकांचे अन्न मानले जाते. त्याच्या विकासासाठी सरकारने एक योजना तयार केली आहे. भरड धान्यामध्ये पोषक घटकांचे प्रमाण बरेच अधिक असते. भरड धान्यात प्रथिने, ‘अ’ जीवनसत्त्व, लोह आणि आयोडिनसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात, असे एका संशोधनात दिसून आले आहे. एकंदरीत, आपण आपल्या जुन्या पीक उत्पादन परंपरेशी पुन्हा नाते जोडत आहारात भरड धान्यांचा आवर्जून समावेश करावा.

वैश्विक साथीच्या आजारातून जग सावरून पुन्हा रुळावर येताना दिसत आहे. जवळ जवळ सर्वच क्षेत्रांत नैराश्य आजही कायम असले तरी आता जगाने महामारीशी लढण्याचे हत्यार शोधून काढले आहे ही समाधानाची बाब आहे. असे असूनही मानवी संपदा जोपासण्याचे सर्वात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. हिंदुस्थानसारख्या देशात ही फार मोठी समस्या आहे. सध्या आपल्याकडे अन्नधान्याची कमतरता नाही. कोरोनाच्या काळात आपल्या शेतकऱयांनी कृषी क्षेत्राला बळकटी दिल्याचे विश्वसनीय आकडेवारीवरून दिसून येते. उद्योग, पर्यटन आणि सेवा यांसारखे आर्थिक विकासाचे स्रोत आटलेले असताना कृषी विकासाच्या दराने एक आदर्श समोर ठेवला आहे, परंतु एवढय़ावरच आपण समाधानी राहता कामा नये. कृषी क्षमता वाढविणे हा आपला आणि आपल्या सरकारचा मूलमंत्र असायला हवा. बदलत्या जलवायू परिस्थितीमुळे अन्नधान्याचा भेडसावणारा प्रश्नही सोडविणे आवश्यक आहे.

अन्नधान्याच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणारे शुद्ध पाणी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. तसेच हवामान बदलामुळे जगातील कृषी उत्पादन करणाऱया अनेक प्रदेशांमध्ये शुष्कपणा वाढला आहे. त्याचा परिणाम होणे साहजिकच आहे. अन्नधान्य उत्पादनावर त्याचा नकारात्मक परिणाम संभवतो. हे नजीकचे धोके लक्षात घेता आपल्या सरकारने अन्नधान्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी एक पद्धतशीर योजना तयार केली आहे, जी आपल्या पारंपरिक शेती पद्धतीवर आधारित आहे, परंतु त्यात थोडे वैज्ञानिक बदल केले आहेत. आपण ज्याला भरड धान्य (मोटा अनाज) म्हणतो आणि ते सामान्यतः गरीब लोकांचे अन्न मानले जाते. त्याच्या विकासासाठी सरकारने एक योजना तयार केली आहे. भरड धान्यामध्ये पोषक घटकांचे प्रमाण बरेच अधिक असते. भरड धान्यात प्रथिने, ‘अ’ जीवनसत्त्व, लोह आणि आयोडिनसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात असे एका संशोधनात दिसून आले आहे. या धान्यांचा वापर केल्यास आपण आपल्या मोठय़ा लोकसंख्येला पोषक अन्नधान्य पुरवू शकू.

ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, मका आदी पिके भरड धान्याच्या श्रेणीत येतात. या धान्यांचे सर्वात मोठे वैशिष्टय़ असे की, ती कोरडय़ा भागातही तयार करता येतात. एवढेच नव्हे तर तांदूळ आणि गव्हाच्या तुलनेत पिकांसाठीचा खर्च कमी येतो. त्यांचे उत्पादनही इतर पिकांच्या तुलनेत कमी वेळात येते. त्यामुळेच हिंदुस्थान सरकारने 2018 हे वर्ष बाजरीचे राष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले होते. हिंदुस्थानच्या या प्रयत्नांचे जगानेही कौतुक करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे ज्याप्रमाणे संपूर्ण जगात हिंदुस्थानी योगाचे वलय निर्माण झाले आहे, त्याचप्रमाणे भरड धान्याच्या उत्पादनावरही जगाचे एकमत होऊ लागले आहे.

पुढील वर्ष म्हणजे 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय जागतिक अन्न संघटनेने घेतला आहे. हरित क्रांतीमुळे आपल्या देशात अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली; पण आपण बरेच काही मागे सोडून पुढे निघून आलो. आकडेवारी असे सांगते की, हरित क्रांतीपूर्वी आपल्या देशात सुमारे 36.50 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर विविध प्रकारच्या बाजरीची लागवड केली जात होती, परंतु 2016-17 मध्ये हे क्षेत्र अवघे 14.72 दशलक्ष हेक्टरवर आले आहे. आपल्या आहाराच्या सर्व सवयींमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. आपला समाज गहू आणि तांदूळ हे उच्चभ्रूंचे अन्न मानू लागला आहे. हे चित्र बदलायला हवे. आगामी काळात आपल्या प्रियजनांची उपासमार होऊ नये असे वाटत असेल तर आहारात पारंपरिक भरड धान्यांचा समावेश करावा लागेल.

तज्ञांच्या मते, कुपोषणाचा अर्थ अन्नाची अनुपलब्धता असा होत नाही. जागतिक अन्न संघटनेच्या मते, 1800 कॅलरीजपेक्षा कमी ऊर्जा जिला मिळते अशी व्यक्तीही कुपोषित असते. आजकाल हिंदुस्थानात कुपोषितांची संख्या कमी झाली आहे; पण अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो आहोत असे मानणे योग्य होणार नाही. समाजालाही सरकारबरोबर पाऊल टाकून भरड धान्य उत्पादनावर भर द्यावा लागेल. उदाहरणच घ्यायचे झाल्यास झारखंडसारख्या पठारी आणि खडकाळ जमिनींच्या प्रदेशासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. या अर्थसंकल्पात झारखंड सरकारने गरीबांना दरमहा एक किलो डाळ सवलतीच्या दरात देण्याची केलेली घोषणा स्तुत्य आहे; परंतु सरकारने हा निर्णय कोणत्या कारणासाठी घेतला? या प्रश्नाचे उत्तर या राज्यातील गावागावांत सापडू शकते.

झारखंडप्रमाणेच देशाच्या अनेक भागांत अशी अनेक भरड तृणधान्ये पिकतात, ज्यात प्रथिने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. सरकारने अर्थसंकल्पातील ठरावीक रक्कम त्या धान्याच्या जाहिरातीवर खर्च करावी. तसेच राज्यामध्ये उत्पादित होणाऱया भातावर अतिरिक्त आधारभूत किंमत निश्चित करण्यात यावी. भरड धान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हिंदुस्थान सरकारने गहू आणि तांदळाच्या तुलनेत त्याच्या समर्थन मूल्यात जवळ जवळ दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे भरड धान्यांकडे शेतकऱयांचा कल वाढेल. लहान आणि मध्यम शेतकऱयांना फायदा होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थाही मजबूत होईल. एकंदरीत, आपण आपल्या जुन्या पीक उत्पादन परंपरेशी पुन्हा नाते जोडले पाहिजे. त्यासोबतच आपल्या आहारविषयक सवयींमध्ये बदल करून त्यात भरड धान्यांचा आवर्जून समावेश केला पाहिजे.

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत.)