
कोरोनाचे संकट कमी होताच रायगड प्रशासनाने वार्षिक आराखड्यात मंजूर केलेली कामे युद्धपातळीवर मार्गी लावली आहेत. त्यामुळे सरकारने मंजूर केलेला 275 कोटींचा निधी शंभर टक्के खर्च झाला असून रायगड जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच शंभर टक्के निधीचा विनियोग करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर याचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे नियोजन विभागाने आर्थिक वर्ष संपुष्टात येण्याआधी काम पूर्ण केले आहे.
सन 2021-22 करता रायगड जिल्ह्यासाठी 275 कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. यापैकी 31 मार्चअखेर 275 कोटी रुपयांचा निधी खर्ची झाला आहे. म्हणजेच जिल्हा विकास योजनेतील शंभर टक्के निधी खर्ची पडला आहे. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे हे यश संपादन करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात जवळपास 50 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करून ती मार्गी लावण्यात जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि नियोजन अधिकारी जे.एम. मेहेत्रे यशस्वी ठरले आहेत.
िजिल्हा विकास निधी अंतर्गत सर्व विभागांना दिलेला निधी मार्चअखेरपर्यंत खर्च झालाच पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांना दिल्या होत्या. यांसदर्भात एकूण 16 आढावा बैठका घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. या निर्देशांचे बुहुतांश विभागांनी पालन केले. त्यामुळे 31 मार्चला दुपारी 1 वाजताच शंभर टक्के निधी खर्ची पडला.
2020-21 या आर्थिक वर्षात करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध यामुळे जिल्हा विकास निधी खर्च करण्यात प्रशासनाला यश आले नव्हते. त्यामुळे जवळपास 14 टक्के निधी पुन्हा शासनाकडे वर्ग झाला होता. या वर्षी तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा नियोजन विभागाने नेटाने प्रयत्न केला.
चार महिन्यांत कामे तडीस
2021-22 या चालू आर्थिक वर्षीही जिल्हा विकास निधीवर करोनाचे सावट होते. मात्र सप्टेंबर महिन्यानंतर राज्यातील करोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याने सर्व जिल्ह्यांना वार्षिक निधी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला उपलब्ध झाला. त्यामुळे चार महिन्यांत सर्व कामे मार्गी लावून निधी खर्च करण्यात आला. आमदार निधीतील 50 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात आमदार विकास कार्यक्रमासाठी 10 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. हा निधीही मार्गी लावण्यात प्रशासकीय यंत्रणांना यश आले आहे.




























































