
नगर जिल्हा बँकेच्या लेखापरीक्षण विभागाला लागलेल्या आगीच्या संदर्भामध्ये आज पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबकडून नमुने तपासणीसाठी नेले आहेत. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या संदर्भामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी सायंकाळी जिल्हा बँकेच्या लेखापरीक्षण विभागामध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे बँकेचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आगीमध्ये लेखापरीक्षण विभागातील सर्व रेकॉर्ड, संगणक तसेच लाकडी कपाटे व साहित्य जळून खाक झाले. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या अधिपत्याखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांनी या ठिकाणी पाहणी केली व घटनेचा पंचनामा केला. फॉरेन्सिक लॅब अधिकारी या ठिकाणी आले होते. त्यांनीसुद्धा या ठिकाणचे काही नमुने तपासणीसाठी घेतले असून, सोमवारी ते प्रयोगशाळेकडे पाठविणार आहे. दुसरीकडे इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणची पाहणी केली. त्यांच्या तपासणीनंतर नुकसान किती झाले याचा आकडा समोर येणार आहे.
दरम्यान, आगीमध्ये जिल्हा बँकेचे अनेक महत्त्वाचे रेकॉर्ड या ठिकाणी होते. बँकेचा लेखा विभाग या ठिकाणी कार्यरत होता.
कोतवाली पोलिसांशी संपर्क साधला असता आम्ही पंचनामा केलेला आहे, या संदर्भात नोंद करण्यात आली असून, तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
इमारतीचे फायर ऑडिट करणार – अध्यक्ष शेळके
जिल्हा बँकेची इमारत 1970 साली बांधण्यात आली आहे. लेखा विभागामध्ये लागलेली आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. यात कागदपत्रांचे नुकसान झाले असले तरी डिजिटल स्वरूपामध्ये ही कागदपत्रे उपलब्ध होतील, असे बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी सांगितले, तर इमारत जुनी असल्यामुळे नेमकी आग कशामुळे लागली, याची माहिती घेतली जाईल. तसेच सर्व इमारतीचे फायर ऑडिट केले जाईल. यात काही त्रुटी असतील, तर त्या दुरुस्त केल्या जातील, असेही ते म्हणाले.


























































