
जालना तालुक्यातील नाव्हा येथे आयशर ट्रकला अचानक आग लागल्याची घटना रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. द्राक्षाची वाहतूक करण्यासाठी आणलेल्या रिकाम्या प्लास्टिक कॅरेटने पेट घेतल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
नागरिकांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. मात्र, वाढती उष्णता आणि पाण्याची कमतरता असल्याने आगीने भडका घेतला. नागरिकांनी अग्निशमन विभागाला पाचारण केले. आयशर ट्रकची डिझेल टँक फुल भरलेली असल्याने आगीत ट्रक भस्मसात झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्याचे 25 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अचानक झालेल्या या घटनेने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.




























































