रॉस टेलरने केले क्रिकेटला अलविदा; निरोप देताना राष्ट्रगीत ऐकून ढसढसा रडला खमक्या रॉस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तो मैदानात फलंदाजीला आला अन स्थिर होऊन तडाखेबंद खेळ करू लागला की प्रतिस्पर्धी गोलंदाजांना अक्षरशः मैदानातच रडायला लागायचे. अशा या खमक्या फलंदाजाला आज मात्र आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीचा निरोप घेताना आपले अश्रू आवरता आले नाहीत. नेदरलँडविरुद्धच्या शेवटच्या तिसऱया वन डेप्रसंगी आपल्या देशाचे राष्ट्रगीत लागल्यावर न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज रॉस टेलर अक्षरशः ढसढसा रडला. आपल्या लाडक्या क्रिकेट खेळापासून आपण आता दूर जाणार या कल्पनेनेच त्याला रडवेले केले. टेलरने आज अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करीत निवृत्ती स्वीकारली. आपल्या लाडक्या खेळाडूची निवृत्ती घेतानाही ही अवस्था पाहून न्यूझीलंडच्या क्रिकेटशौकिनांचेही डोळे मग अश्रूंनी डबडबून गेले.

वन डेत सर्वाधिक धावा

रॉस टेलर मैदानात उतरून एकदा सेट झाला की जगातल्या भल्या भल्या गोलंदाजांच्या चेंडूची पिसे काढायचा, त्यामुळेच त्याची क्रिकेटच्या मैदानावर धडाकेबाज फलंदाज म्हणून मोठी दहशत होती. न्यूझीलंडच्या वतीने सर्वाधिक धावा नोंदवण्याचा विक्रम टेलरच्या नावावर आहे. त्याने 236 वनडेत 8,607 धावांची नोंद केली आहे. त्यात 21 शतके आणि 51 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 181 ही त्याची वन डेतील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध वन डे पदार्पण करणाऱया रॉसने 112 कसोटींतही 7,683 धावांची नोंद केली आहे. त्यात 19 शतके आणि 35 अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. 102 टी 20 लढतीत टेलरने 7 अर्धशतकाच्या सहाय्याने 1909 धावा केल्या आहेत. 38 वर्षीय टेलर आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या वन डेत मात्र नेदरलँड संघाविरुद्ध केवळ 14 धावाच नोंदवू शकला.