पोदार शाळेची बस पाच तास ‘गायब’! विद्यार्थ्यांच्या काळजीने पालकांचा जीव टांगणीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

…अरे मग गेली कुठे बस? पाच तास झाले… मुलं आमची घरी पोहोचलेली नाहीत. तुमच्या ड्रायव्हरचाही फोन लागत नाही. गाडी गेली कुठे? संतप्त पालकांनी सांताक्रुझच्या पोदार स्कूलच्या व्यवस्थापनाला आज अक्षरशः धारेवर धरले होते. विद्यार्थ्यांना घरी सोडणारी शाळेची बस तब्बल पाच तास गायब होती. मुलं घरी सुखरूप पोहोचल्याचे कळले, फोनवर त्यांचा आवाज ऐकला तेव्हा त्यांचा जीव भांडय़ात पडला. गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली होती, असे सांगितले गेले. पण त्यादरम्यान पालकांची अवस्था मात्र ‘हार्ट फेल’ झाल्यासारखी झाली होती.

सांताक्रुझमधील सरस्वती मार्गावर असलेल्या आनंदीलाल ऍण्ड गणेश पोदार सोसायटीच्या पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी बसची सुविधा आहे. आज सकाळी विद्यार्थी शाळेच्या बसने शाळेमध्ये आले. दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बसमध्ये बसले. परंतु ठरलेल्या वेळेत घरी पोहोचले नाहीत. बसचाही पत्ता नव्हता. शाळेजवळून निघालेली बस पाच तास कुठे होती कुणालाच माहीत नव्हते. पालकांनी शाळेशी संपर्क साधला. त्यावेळी मुलांना घेऊन बस कधीच निघाली असे उत्तर मिळाले. त्यामुळे पालकांच्या काळजात धस्स झाले.

एक-एक करत पालक शाळेमध्ये पोहोचले. व्यवस्थापनाला त्यांनी विचारणा केली. परंतु व्यवस्थापनाकडेही काहीच उत्तर नव्हते. कारण बसच्या चालकाचा फोनच लागत नव्हता. पालकांनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱयांना धारेवर धरले. पालकांनी सांताक्रुझ पोलीस ठाणे गाठून याची माहिती दिली. पोलीसही शाळेत पोहोचले. दरम्यान, पोलिसांच्या गाडय़ा बसच्या शोधार्थ निघाल्या. काही पालकही दुचाकीवरून बसच्या मार्गावर रवाना झाले. परंतु बस कुठेच दिसली नाही. पाच तास शोधाशोध सुरू होती. त्यानंतर एकेक करत पालकांना त्यांच्या मुलांचे फोन येऊ लागले. त्यावेळी त्यांना हायसे वाटले.

संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे शिक्षण उपसंचालकांचे निर्देश

या संपूर्ण प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर तत्काळ कारवाई करावी आणि संपूर्ण घटनेबाबत मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत खुलासा करावा, असे निर्देश शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी शाळेच्या सीईओंना दिले आहेत. ‘शाळेत आलेले विद्यार्थी वेळेवर घरी पोहोचले नाहीत. ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन बस सेवेचे योग्य नियोजन करणे आवश्यक होते. तसे न केल्यामुळे पालकांना प्रचंड मानसिक त्रास झाला.’ असे संगवे यांनी शाळेला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

शाळेच्या बसचा ड्रायव्हर नवीन होता. त्याला बसचा नेहमीचा मार्गच माहीत नव्हता. त्याने दुसऱया मार्गावरून बस काढली आणि ट्रॅफिकमध्ये अडकली. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी सोडता-सोडता उशीर झाला.  
-हीना शहा, सीईओ, आनंदीलाल ऍण्ड गणेश पोदार सोसायटी

ड्रायव्हर रस्ता चुकल्याने मुले घरी उशिरा पोहोचली. याबाबत शाळेशी बोलणे झाले आहे. शाळेने दोन दिवस बस सेवा बंद ठेवली आहे. मुले घरी सुरक्षित पोहोचलीत.
-विश्वास नांगरे-पाटील, सह-पोलीस आयुक्त