
राज्यातील राजकारण बदलले आहे. काही लोक अचानक भोंगे बंद करण्याची भाषा करायला लागले आहेत, अरे इतके दिवस काय झोपा काढल्या होत्या? अशा भोंग्यांच्या गोष्टी करून विकास होत नसल्याचा टोला उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी राज ठाकरे यांना लगवला आहे. दरम्यान, विकासाला महत्त्व देण्याऐवजी वेगळ्याच चर्चा घडवून समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा शाहू-फुले- आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्याचा विसर त्यांना पडल्याचेही ते म्हणाले.
नगर जिह्यातील शिर्डी आणि कोपरगावातील विविध विकासकामांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ आदी यावेळी उपस्थित होते. आपण किती वर्षांपासून महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने राहत आहोत. एकमेकांच्या सणांचा आदर करतो. ही आपली संस्कृती असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पोलिसांना घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने जीर्ण झालेल्या राज्यातील 75 पोलीस ठाण्यांचे बांधकाम करण्यात येईल. तसेच राज्यात पोलिसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमास 860 कोटी उपलब्ध करून दिली आहेत. या निधीत पुरवणी मागण्यांमध्ये अधिक वाढ करण्यात येईल. असा शब्द मी आज गृहमंत्र्यांना देतो. पोलिसांसाठी 535 स्क्वेअर फुटांचे साडेसहा हजार फ्लॅट शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत, असेही अजित पवार म्हणाले.























































