
जव्हार तालुक्यातील अनेक गावे, वाडे, पाड्यांवर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी दिवसरात्र विहिरीवर खडा पहारा ठेवावा लागत आहे. विहिरीतील पाणी नाही मिळाले तर तीन किलोमीटर पायपीट करून आदिवासींना पाणी आणावे लागत आहे.
जव्हार तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या अतिदुर्गम वावरं-वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सागपाना आणि रेठीपाडा या ठिकाणी मार्च महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. आजमितीस येथील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी २७ मार्चला तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र एप्रिल महिना सुरू झाला तरी टँकर न मिळाल्याने येथील आदिवासींनी श्रमदान करून तेथे डबके तयार केले आहे व तेथील गाळ आणि चिखलमिश्रित पाणी पिऊन आदिवासींनी आपली तहान भागवली आहे. त्यामुळे येथील आदिवासींचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना दिवसरात्र हंडाभर पाण्यासाठी विहिरीवर खडा पहारा द्यावा लागतो. त्यानंतर कुठे हंडाभर पाणी मिळते. तेही पाणी नाही मिळाले तर तीन किलोमीटर अंतरावरच्या वावर आणि डाहूळ येथील नाल्यातून पायपीट करत हंडाभर पाणी आणावे लागत आहे.
अधिकारी फिरकलेच नाहीत
महिनाभरापासून गावपाड्यावर भीषण पाणीटंचाई सुरू असूनही तहसील विंâवा पंचायत समितीचा एकही अधिकारी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वाड्यावस्त्यांवर फिरकलेला नाही. टँकर कधी सुरू होईल याचेही उत्तर मिळत नाही. त्यामुळे वावरं-वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सागपाना आणि रेठीपाडा ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे.


























































