
>> दिवाकर शेजवळ
दलित पँथरचे संस्थापक नेते, पद्मश्री नामदेव ढसाळ हे आज आपल्यात नाहीत. ते हयात असते तर सुवर्ण महोत्सवाचे सर्वाधिक हकदार तेच ठरले असते हे कोण नाकारेल? पँथरच्या वर्धापन दिनाची परंपरा त्यांनी देहात प्राण आणि त्राण असेपर्यंत जपली. त्यानुसार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर, श्यामदादा गायकवाड, कॉम्रेड सुबोध मोरे, कवयित्री मलिका अमरशेख यांच्यासह सर्वांचा सुवर्ण महोत्सव येत्या 9 जुलै रोजीच आहे. 29 मे रोजी तर डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन आहे.
हे वर्ष ( 2022) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात 66 वर्षे चालत आलेल्या आंबेडकरी चळवळीत ऊर्जा, चैतन्य, संघर्षाचा सर्वोच्च बिंदू ठरलेल्या ‘दलित पँथर’च्या सुवर्ण महोत्सवाचे आहे. हा सुवर्ण महोत्सव येत्या 9 जुलै रोजी राज्यात साजरा होईल. हा संकल्प गेल्या वर्षी म्हणजे 2021मध्ये पँथर शहीद रमेश देवरुखकर (5 जानेवारी 1974) आणि पँथर भागवत जाधव (10 जानेवारी 1974) यांच्या स्मृती दरवर्षी नित्यनेमाने जपणाऱ्या 10 जानेवारी या शहीद दिनाच्या तोंडावर पुढे आला अन् त्यादृष्टीने हालचालीही सुरू झाल्या. त्यासाठी एक प्राथमिक समिती स्थापन करून पूर्वतयारीसाठी बैठका घेण्यात कॉम्रेड सुबोध मोरे यांनी पुढाकार घेतला होता.
10 जानेवारीचा शहीद दिन आंबेडकरी चळवळ राज्यात दरवर्षी सर्वत्र साजरा करत आली आहे, पण त्यात शहीद भागवत जाधव यांचे बंधू पँथर सी. रा. जाधव आणि सुमेध जाधव यांच्या सहभागाने मुंबईतील माझगाव बीआयटी चाळ, लव्हलेन येथे होणारी अभिवादन सभा ही कायम मुख्य आणि केंद्रबिंदू राहिलेली आहे. गेल्या वर्षी मात्र दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवाच्या दृष्टीने सुरू झालेल्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर 10 जानेवारीची मुख्य अभिवादन सभा दादर ( पूर्व) येथील डॉ. आंबेडकर भवनात पार पडली. त्या सभेचे आयोजन शहीद भागवत जाधव स्मृती केंद्राचे अध्वर्यू पँथर सुमेध जाधव आणि दलित पँथर सुवर्ण महोत्सव समितीचे निमंत्रक कॉम्रेड सुबोध मोरे यांनी केले होते.
सैन्य पुरवणारी पँथर
1970 च्या दशकात पँथरने आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाने उमद्या तरुण नेत्यांसह झुंजार, समर्पित कार्यकर्त्यांचे ‘सैन्य’च आंबेडकरी चळवळीला पुरवले! आजचे बरेच रिपब्लिकन नेते ही पँथरचीच अपत्ये आहेत. विद्यमान केंद्रीय मंत्री, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले हे एकेकाळचे पँथर नेतेच आहेत. त्यामुळे पँथरच्या सुवर्ण महोत्सवासाठी तेही सरसावले आहेत. त्यांनीही एक स्वतंत्र समिती एक बैठक घेऊन स्थापन केली आहे. पँथर चळवळीतील अग्रणी, ज्येष्ठ नेते, साहित्यिक अर्जुन डांगळे हे त्या बैठकीत सहभागी होते. आठवले यांचा पक्ष म्हणजे 1990 सालच्या एकीकृत रिपब्लिकन पक्षापूर्वीची भारतीय दलित पँथर होय. शिवाय, मूळच्या दलित पँथरच्या पाच संस्थापक नेत्यांपैकी एक असलेले माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ आठवले यांच्यासोबतच आहेत. नव्हे, राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून ते रिपाइंमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत.
पँथरची नाना रूपे, अनेक आवृत्त्या
दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव हा राज्यात एकत्रितपणे आणि एकजुटीने व्हावा अशी आशा-अपेक्षा बाळगणे भाबडेपणाचे आणि अवास्तव ठरेल. ते अव्यवहार्य आणि अशक्य कोटीतील आहे. त्यामुळे काही पँथर नेते एकीकडे, तर काही दुसरीकडे असे चित्र दिसणे साहजिकच आहे. त्यातून सुवर्ण महोत्सवाच्या आनंदावर विरजण पाडून घेण्यात अर्थ नाही. कारण 1972 ची मूळची दलित पँथर आणि 1977ची भारतीय दलित पँथर विसर्जनामुळे इतिहासजमा झाली असली तरी रिपाइंच्या वेगळ्या रूपात आणि अनेक नव्या आवृत्त्यांच्या रूपात ती अस्तित्वात आहे. ते सारेच सुवर्ण महोत्सव साजरा करतील यात शंका नाही. शिवाय, पँथरचे एक संस्थापक नेते नामदेव ढसाळ यांच्या पश्चात त्यांची ‘दलित पँथर’ आता त्यांच्या कवयित्री पत्नी मल्लिका अमरशेख-ढसाळ या चालवत आहेत. सुवर्ण महोत्सव त्यांचाही स्वतंत्र असणार आहे.
अशा वातावरणात रामदास आठवले यांनी दलित पँथरचे पुनरुज्जीवन करण्याची गरज व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे, तर ताज्या संसद अधिवेशनात त्यांनी देशात दलितांवरील अत्याचारांत 2014 नंतर म्हणजे मोदी सरकारच्या राजवटीत वाढ झाली आहे, हे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे, तर दुसरीकडे ‘पँथर’ हे नाव धारण करणारे अनेक गट मराठवाडय़ात आधीच अस्तित्वात असताना काही जणांनी त्या प्रांतात पँथरच्या पुनरुज्जीवनासाठी हालचाली चालवल्या आहेत.
एकेकाळी म्हणजे 1977 सालात राजा ढाले यांनी बरखास्त केलेल्या पँथरला मराठवाडय़ानेच संजीवनी दिली होती हे खरेच. प्रा.अरुण कांबळे, गंगाधर गाडे, एस.एम.प्रधान, प्रीतमकुमार शेगावकर, टी. एम. कांबळे, दयानंद मस्के, उमाकांत रणधीर आदींनी पुनरुज्जीवन केलेल्या भारतीय दलित पँथरचे प्रदीर्घ काळ रामदास आठवले हेच खऱ्या अर्थाने ‘चेहरा’ बनले होते. मात्र 1990 च्या रिपब्लिकन ऐक्यात भारतीय दलित पँथर विलीन करण्यात आली. त्यानंतर आठवले ‘वजा’ झालेली पँथर उभे करण्याचे अनेकांचे प्रयत्न असफल ठरले होते.
त्या पार्श्वभूमीवर, आजच्या काळात गरज असली तरी आणि खुद्द रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला तरी पँथर पुन्हा कितपत उभी राहू शकेल, याबाबत साशंकताच आहे. कारण आजच्या टेक्नोसॅव्ही तरुण दलित पिढीला पाच दशकांपूर्वीसारखा ठोशास ठोसा या न्यायाचा संघर्ष आणि रस्त्यावरचा लढा कितपत स्वीकारार्ह ठरेल, मानवेल? हा प्रश्नच आहे. शिवाय, अत्याचारांचा प्रश्न 1970 प्रमाणे पुन्हा एकदा आव्हान बनला असतानाच आजच्या दलित तरुणांना शिक्षण, शिष्यवृत्ती, नोकरी-रोजगाराच्या संधी या प्रश्नांनी काय कमी ग्रासले आहे? त्या प्रश्नांना कोण आणि कधी भिडणार? अनुसूचित जातींच्या विशेष घटक योजनेच्या निधीची पळवापळवी सुरू आहे. ती कोण रोखणार?
पँथरच्या सुवर्ण महोत्सवाची पूर्वतयारी आणि त्या संघटनेचे पुनरुज्जीवन करण्याचे संकल्प केले जात असतानाच त्यासंदर्भात पँथरच्या पाच नायकांपैकी एक असलेले संस्थापक नेते ज. वि. पवार यांचे एक छापील पत्रक मराठवाडय़ातून हाती आले आहे. त्यात ते म्हणतातः दलित पँथर ही संघटना 29 मे 1972 रोजी स्थापन झाली आणि 7 मार्च 1977 रोजी बरखास्त करण्यात आली. म्हणजे 1972 ते मार्च 1977 हा तिचा कार्यकाल असला तरी 25 जून 1977 रोजी देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर त्या चळवळीला प्रतिरोध निर्माण झाला. म्हणजे 25 जून 1977 पर्यंतच दलित पँथरचा उग्र लढा अस्तित्वात होता. त्या दलित पँथरला येत्या 29 मे 2022 रोजी अर्धशतक पूर्ण होत आहे.
स्थापना आणि बरखास्तीदरम्यानचा काळ हा पाच वर्षांचा असला तरी पँथर ही मे 1972 पासून आणीबाणी लागू होईपर्यंतच म्हणजे जेमतेम तीन वर्षेच खऱया अर्थाने कार्यरत होती अन् तिचाच हा सुवर्ण महोत्सव आहे हेच पवार यांनी त्यातून अधोरेखित केले आहे. मग बरखास्तीचा ‘वार’ झालेल्या घायाळ पँथरला जीवदान देऊन 1990 पर्यंत वाढवलेल्या आणि 17 वर्षे निकराची झुंज देत मराठवाडा विद्यापीठ नामांतराची लढाई जिंकलेल्या तमाम पँथर्सचे काय? हा सुवर्ण महोत्सव त्यांचाही नाही काय? या सुवर्ण महोत्सवावर खरा नैतिक अधिकार कुणाचा? ‘जयभीम के नारे पे’ रक्त सांडण्यास बलिदानास तयार होऊन 1970च्या दशकापासून घरेदारे वाऱयावर सोडून मैदानात उतरलेल्या झुंजार पँथर्सचा की त्यांचा अवसानघात करणारा बरखास्तीचा निर्णय घेऊन त्या चळवळीपासून नाते तोडून आजवर अलग राहिलेल्यांचा?
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि दलित चळवळीतील अग्रणी आहेत.)
[email protected]


























































