लोकधन – लोकमानसाचे स्वरूप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. संजय बोरुडे

परंपरेने चालत आलेल्या लोकजीवनामध्ये जे साहित्य वाङ्मय तयार होते त्यात लोकगीते, लोककथा, दैवतकथा, अशा अनेक बाबींचा समावेश होतो. अशा लोकश्रद्धा, रुढी, प्रथा यांचा वेध घेणारे सदर.

लोकसाहित्य हा शब्द आता तसा बराच रुळला आहे, मात्र अद्यापही त्याचा ठाव लागत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणूनच त्याची सर्वमान्य अशी व्याख्या अजून झाली नसावी. असे म्हणतात की, प्रचलित साहित्य अथवा अभिजात बनवले जाणारे साहित्य थकते तेव्हा ते लोकसाहित्यातून ऊर्जा घेते. उदाहरणार्थ कोणत्याही भाऊबंदकीसंदर्भात कलाकृती घेतली तर त्याच्यात सापडणारे आदिबंध हे प्राचीन असतात. महाभारतातील भाऊबंदकीची रूपे नंतरच्या अशा प्रकारच्या साहित्यात उतरलेली आढळतात. नव्हे ती लोकमानसात एवढी रुळलेली असतात की, लोक बोलताना सहज म्हणतात की, अमका तमका कर्णासारखा उदार आहे किंवा दुर्योधनासारखा दुष्ट आहे. म्हणजे तौलानिक अंगाने हे लोकसाहित्याचे बंध प्रकट होतात. हे लोकबंध जगात सर्वत्र सारखे असतात.

इजिप्शियन सम्राट ‘रेम’वरून आपल्याकडे ‘राम’ हे नाव आले असे मानले जाते. या रेम ऊर्फ रेमसेसच्या पित्याचे नाव होते ‘तुशरत.’ हे नाव अर्थातच ’दशरथ’ नावाशी मिळतेजुळते. जगभरातल्या लोकसाहित्यात अशी साधर्म्यस्थळे आढळतात. लोकसाहित्याची व्याप्ती मोठी आहे. परंपरेने चालत आलेल्या लोकजीवनामध्ये जे काही वाङ्मय तयार होत असते. त्यामध्ये लोकगीते, लोककथा, उखाणे, पुराणकथा, दैवतकथा, आख्यायिका अशा अनेक बाबींचा समावेश होतो. तसेच लोकजीवनातील आचार-विचार, रूढी, प्रथा, लोकसमजुती, लोकश्रद्धा, धार्मिक आणि सांस्कृतिक विधी, लोककला, लोकभ्रम इत्यादी बाबीही लोकसाहित्यात मोडतात. जे जे काही लोकांशी संबंधित आहे त्या सर्व गोष्टींमुळे लोकसंस्कृती तयार होत असते.

लोकसंस्कृतीमध्ये लोकमानसाचे प्रतिबिंब पडलेले असते. ‘लोकमानसामध्ये लोकभावना, लोकजीवन, समूहाच्या संकल्पना इत्यादी बाबींचा समावेश होतो. म्हणूनच लोकसाहित्याचा कर्ताकरवता एकजण नसतो, तर अनेक लोक असतात. पुन्हा हे लोकसाहित्य मौखिक परंपरेने जपलेले असते. हे ऐकायला गोड वाटत असले तरी पूर्वीच्या काळी लिहिण्या-वाचण्याचा अधिकार सर्वसामान्यांना नव्हता हे वास्तवही ध्यानात येते. हे साहित्य सहज जतन करता यावे म्हणून त्याला एकप्रकारचा नाद, लय असते. लोकगीतांना किंवा ओव्या, अभंग यांना या लोकलयीतील चाली बांधलेल्या असतात. त्या अवीट गोडीच्या असतात. त्यामुळेच ती गीते ओव्या, अभंग सहज लक्षात राहतात आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्द केली जातात.
तीच गोष्ट लोककथांची. लोककथा सांगताना विशिष्ट ऱिहदममध्ये, तालात सांगितल्या जात. उदाहरणार्थ

एक होता राजा
त्या राजाला होती राजकन्या
कशी होती महाराजा?
साक्षात पद्मिनी. काय तिचं रूप…
सूर्याला म्हणते उगवू नको आन चंद्राला म्हणते मावळू नको

यातील लय, ताल, नाद सहज लक्षात येतो. करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील गंगाराम कांबळे हे वृद्ध गृहस्थ आजही अशा अनेक लोककथा सांगतात. पूर्वी रेल्वे रुळांच्या कामाला जाताना ते एकच गोष्ट रात्रभर सांगायचे. आमच्या गल्लीत लहानपणी सुगराबाई अशाच रात्रभर सांगायच्या. अरेबियन नाइटस्सारख्या या महाराष्ट्रीयन लोककथा जपल्या गेल्या पाहिजेत. राष्ट्रीय स्तरावर रॉबिन रॉय चौधरी तर राज्यस्तरावर सरोजिनी बाबर, शांता शेळके यांनी मोलाचे काम केले आहे. अर्थात या प्रकारच्या लोककथा या श्रमपरिहार याबरोबरच प्रबोधनाचे काम करतात. लोकगीतामधली हे एक पहा.

‘पाठचा गं भाऊ
कसा झाला लोकवानी
वाट पाहता पाहता
डोळा झाला कुकावानी

कूटप्रश्न किंवा उखाणे यातूनही गणिती प्रक्रिया सहज समजावून
सांगितल्या जात. उदाहरणार्थ

एका किल्ल्याला नऊ बुरुज
नऊ बुरुजावर नऊ नऊ गोसावी
नऊ नऊ गोसाव्यांच्या हातात नऊ नऊ झोळय़ा
नऊ नऊ झोळय़ांत नऊ नऊ पोळय़ा
तर झोळय़ा किती, पोळय़ा किती आणि गोसावी किती?

यातून किती सहज नऊची गणिती कसोटी सांगितलेली आहे. असे हे लोकधन उघडय़ा डोळय़ांनी, कानांनी जतन करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आपले हे लोकसंचित खेडोपाडय़ातील ‘कृषिजनमानसाचे महत्त्वाचे वैभव आहे. मोटेवरची गाणी, ओव्या, अभंग, भलंरीगीते, लग्नगीते, विधीगीते, दैवतकथा, पुराणकथा, चालीरीती यातून कल्पनांचे अवशेष, उखाणे, आन्हे, म्हणी, वाक्प्रचार आणि अगदी शिव्याही लोकसाहित्यात मोडतात. लोकसाहित्य आपल्याला व्यावहारिक शहाणपण शिकवतात. मनोरंजनातून प्रबोधन करत आपले जीवन समृद्ध करतात.