कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूक – 11 वाजेपर्यंत 20.57 टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदान अत्यंत शांततेत सुरू असून पहिल्या दोन तासात अवघे 6.96 टक्के मतदान झाले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी ही निवडणूक होत असून इथली लढत अत्यंत चुरशीची होत आहे. महाविकास आघाडीने या मतदरासंघात जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने इथे सत्यजित कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

कोल्हापुरात 357 मतदान केंद्रे असून 11 वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार 20.57 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता पहिल्या दोन तासात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्यासह पालकमंत्री सतेज पाटील,महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे,जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदींनी मतदान केले.

मतदान केंद्राच्या 100 मीटर अलीकडे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी बूथ लावण्यात आले आहेत. मतदान केंद्र परिसरात जिल्हा प्रशासनाकडून मतदारांना मतदान केंद्रासंदर्भात माहिती देण्यात येत होती. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवून परत घरी सोडण्यासाठी मोफत रिक्षांचे नियोजन केले आहे. या मतदारसंघात एकूण 2 लाख 91 हजार 798 मतदार संख्या असून यामध्ये महिला मतदारांची संख्या 1 लाख 46 हजार 018 इतकी आहे. पुरूष मतदारांची संख्या ही 1 लाख 45 हजार 768 तसेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 12 आहे.