गोरेगावमध्ये एमडी ड्रग्जसह दोघा तस्करांना पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुन्हे शाखा युनिट 10च्या पथकाने गोरेगाव येथे दोघा ड्रग्ज तस्करांना पकडून तब्बल 12 लाख किमतीचा 250 ग्रॅम किमतीचा एमडीचा साठा हस्तगत केला. दोघेही आरोपी जोगेश्वरी येथील राहणार असून ते हा एमडी कोणाला विकणार होते व तो कोणाकडून घेतला होता याचा पोलीस शोध घेत आहेत.

युनीट-10 चे पथक गोरेगाव पूर्वेकडील बिंबीसार कॉलनी परिसरात गस्त घालत असताना त्यांना एक इसम संशयास्पद हालचाल करताना दिसला. त्यामुळे पोलीस पथक त्याच्या जवळ गेले असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला, मात्र पोलिसांनी त्याला पकडून त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता पिशवीत 250 ग्रॅम एमडीचा साठा सापडला. हा एमडी कुठून आणला, अशी विचारणा केली असता त्याने गोरेगाव पश्चिमेकडील हॉटेल मुव्हिस्टारमध्ये असलेल्या इसमाकडून घेतल्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ते हॉटेल शोधून दुसऱ्या आरोपीलाही पकडले. इक्बाल शेख (28) आणि जहांगिर खान (40) अशी आरोपींची नावे आहेत.