श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्तींची विशेष काळजी घ्या, डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमाता यांच्या मूर्तींची होणारी झीज रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करा, असे सक्त निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी जिल्हाधिकारी, पुरातत्व विभाग आणि मंदिर प्रशासनाला दिले.

श्री रुक्मिणीमातेच्या मूर्तीचे चरण झिजल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भाविकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आज डॉ. नीलम गोऱहे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्रीकांत मिश्रा, सहाय्यक संचालक विलास वाहने, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव आदी उपस्थित होते.

वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दोन्ही मूर्तींची विशेष काळजी घ्यायला हवी. पुरातत्व विभाग, मंदिर आणि मूर्ती संवर्धन विषयातील तज्ञ यांचे मत विचारात घेऊन उपाययोजना कराव्यात. यासाठी पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी मूर्तींची प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजनांबाबतचा अहवाल              5 मेपर्यंत सादर करावा, अशा सूचना डॉ. नीलम गोऱहे यांनी दिल्या.

मंदिराच्या गर्भगृहात वापरले जाणारे पूजासाहित्य, द्रवपदार्थ यामुळे गाभाऱयातील आर्द्रतेचे प्रमाण वाढले असल्याची शक्यता पुरातत्वच्या अधिकाऱयांनी व्यक्त केली.