
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिल्लीतील हिंदू सेनेने कथितरित्या शुक्रवारी, 15 एप्रिल रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या मुख्य गेटवर भगवे ध्वज लावले. संघटनेने कथितरित्या कॅम्पसभोवती पोस्टर चिकटवले होते, ज्यावर “भगवा जेएनयू” लिहिले होते.
रामनवमीच्या दिवशी जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या हाणामारीची चौकशी सुरू असताना आता हा नवा प्रकार समोर आला आहे. 10 एप्रिल रोजी डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य यांच्यात हाणामारी झाली. तर डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, त्यांना मांसाहार करण्यापासून रोखण्यात आले. रामनवमीच्या दिवशी वसतिगृहात सण साजरा करण्यापासून रोखत असल्याचा अभाविप सदस्यांनी आरोप केला.
काही विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात अभाविप सदस्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. अभाविपच्या सदस्यांनी पोलिसांत तक्रारीही केल्या आहेत. शारीरिकदृष्ट्या विकलांग असूनही त्याच्यावर हल्ला झाल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले.
जेएनयू प्रशासनाने या घटनेची स्वतंत्र चौकशी सुरू केली असून या घटनेबाबत विद्यार्थ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहनही विद्यापीठाने केले आहे.
दक्षिण पश्चिम पोलीस उपायुक्त मनोज सी यांनी शुक्रवारी सांगितले की “झेंडे त्वरीत काढून टाकण्यात आले”. “आज आमच्या लक्षात आले की जेएनयूच्या आजूबाजूला काही झेंडे आणि बॅनर रस्त्यावर लावण्यात आले आहेत. ते तातडीने काढून टाकण्यात आले आणि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात आहे”, ते म्हणाले.




























































