
केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला ‘पंतप्रधान आवास योजने’तील घरकुलांचा प्रश्न नगर शहरात रखडल्याचे दिसून येत आहे. शहरात अवघा एक प्रकल्पच पूर्णत्वाला गेला असून, उर्वरित सर्व प्रकल्प अद्यापि कागदावरच आहेत. हे प्रकल्प पूर्णत्वाला कधी जातील, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून, महापालिका प्रशासन या संदर्भात काय पावले उचलणार, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
‘पंतप्रधान आवास योजने’त केवळ 300 चौरस फुटांचेच घरकुल (सदनिका) मिळणार असल्याने मध्यमवर्गीयांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यातही घराची किंमत 9 ते 10 लाख रुपये आहे. या किमतीत केडगाव, बोल्हेगावसारख्या उपनगर परिसरात घरकुले मिळत असल्याने या योजनेकडे मध्यवर्गीय पाठ फिरवत आहेत.
नगर शहरात मनपाकडे दाखल 17 हजार अर्जांपैकी 11 हजार 323 लाभार्थी पात्र ठरले. 2018 मध्ये केडगाव येथे 624 व नालेगाव येथे 296 अशा 840 घरकुलांचा प्रकल्प घटकांतर्गत संजयनगर येथे 298 घरांचा प्रकल्प मंजूर आहे. 2019 मध्ये आगरकर मळा येथे 594 घरांचा आणखी एक प्रकल्प मंजूर झाला आहे. केडगाव व नालेगाव प्रकल्पासाठी पात्र लाभार्थ्यांची सोडत काढून 840 लाभार्थी निश्चित झाले. या प्रकल्पाची निविदा प्रक्रियाही झाली आहे. मात्र, या दोन्ही प्रकल्पांतील 24 जणांनी अनामत रकमा परत नेल्या आहेत. संजयनगर येथे 298 पैकी 33 घरकुलांचे काम पहिल्या टप्प्यात झाले आहे. आगरकर मळा येथील प्रकल्पाची निविदा प्रक्रियाही झालेली नाही.
840 घरकुलांसाठी केवळ 45 लाभार्थ्यांकडूनच नोंदणी झाली आहे. केडगाव येथे 624 सदनिकांचा प्रकल्प मंजूर झाला असून, नालेगाव येथे 216 सदनिकांचा प्रकल्प मंजूर आहे. त्यातील 99 हजार 323 लाभार्थी ठरले होते. केंद्र सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केलेला होता. मात्र, स्थानिक पातळीवर या योजनेला म्हणावा असा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. मध्यमवर्गीयांना या प्रकल्पाकडे आकर्षित करण्यासाठी 300 चौरस फुटांऐवजी किमान 500 चौरस फुटांपर्यंत जागा असणे आवश्यक आहे. तसेच, सामान्य बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने त्यांच्यासाठी शासनाने वित्तीय महामंडळामार्फत कर्जसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
शिवसेनेच्या तत्कालीन महापौर शिला शिंदे यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला होता. तो प्रकल्प त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पूर्ण करून त्याचे लोकार्पण केले होते. मात्र, त्यानंतर महापालिका क्षेत्रात जागा निश्चित केलेले इतर प्रकल्प रखडले आहेत.
मार्केटिंग एजन्सीचा प्रस्ताव लालफितीत
महापालिकेने या योजनेसाठी मार्केटिंग एजन्सी नियुक्त करण्याचा प्रस्ताव केला होता. लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवणे, त्यांची अर्ज प्रक्रिया, अर्थसाहाय्यासाठी मदत करणे आदी कामे या संस्थेकडून केली जाणार होती. मात्र, मागील वर्षभरापासून या एजन्सी नियुक्तीचा प्रस्ताव लालफितीतच अडकला आहे.
लाभार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने प्रकल्प ठप्प
‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत नगर शहरात मंजूर असलेल्या घरकुल प्रकल्पांपैकी संजयनगर वगळता इतर सर्व प्रकल्प चार वर्षांपासून कागदावरच आहेत. केडगाव व नालेगाव येथील घरकुलांसाठी 45 लाभार्थ्यांनी अनामत रक्कम भरली होती. मात्र, त्यातील 24 जणांनी मनपाकडून अनामत रकमा परत घेतल्या आहेत. मोदी सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला लाभार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने निविदा मंजुरीनंतरही प्रकल्प उभारणीचे काम ठप्पच आहे.


























































