
आरोग्याच्या अडचणींवर मात करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थपणे राज्यकारभार सांभाळत आहेत. अशा वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या चुलत भावाल समजून घेत त्यांच्या रस्त्यामध्ये विघ्न निर्माण करण्याचं काही करू नये, अशी भावनिक साद राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घातली आहे. नाशिक येथे वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींसोबत बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भोंग्यावरून सध्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून विविध राजकीय नेत्यांकडून त्यावर दररोज प्रतिक्रिया येत आहेत. अशातच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना देखील भोंग्यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी राज ठाकरे यांना भावनिक साद घातली. ‘भोंगे हा काही प्रश्न नाही आणि यातून राज्य सरकारला त्रास द्यायचा प्रकार सुरू आहे. निदान राज ठाकरे यांनी तरी समजून घ्यायला पाहिजे की स्वत:चा चुलत भाऊ, ज्यांच्यासोबत ते आयुष्यभर राहिले ते उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कदाचित स्वत:च्या मुलापेक्षा अधिक प्रेम राज ठाकरेंवर केलं आहे’, अशी आठवण भुजबळ यांनी यावेळी करून दिली. तसेच ‘आज उद्धव ठाकरे आरोग्याच्या अनेक अडचणींवर मात करत समर्थपणे राज्य सांभाळताहेत आणि त्यांच्या रस्त्यामध्ये विघ्न निर्माण करण्याचं काही कारण आहे असं मला असं वाटत नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


























































