राजकीय भावनेतून गेलात तर रामलला मदत करणार नाही, संजय राऊत यांनी टोचले कान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा अयोध्येचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यावरून चर्चा, प्रतिक्रिया सुरू आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्येत जाण्याची घोषणा आणि शिवसेनेच्या अयोध्या यात्रेवरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना आज प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी शिवसेना आणि अयोध्येचं भावनिक नातं समाजवलं. तसंच ‘प्रभु श्रीरामाच्या चरणी कुणीही जाऊ द्या, पण खुल्या आणि साफ अंत:करणातून जाणं आवश्यक आहे. तुम्ही राजकीय भावनेतून गेलात तर रामलला मदत करणार नाही.’, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरे यांचे कान टोचले.

पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना शिवसेना नेहमीच अयोध्येत जात राहिली असून आमचे आणि अयोध्येचे नाते राजकीय, निवडणुका किंवा षडयंत्राचा भाग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘जेव्हापासून अयोध्येचं आंदोलन सुरू आहे तेव्हापासून अयोध्या आणि शिवसेनेचं भावनिक नातं आहे. एक श्रद्धेचं नातं आहे. तर ते राहिलंच. सरकार आमचं नव्हतं तेव्हा देखील आम्ही जात होतो. आंदोलनातही होतो. मराष्ट्रात सरकार स्थापल्यानंतर देखील मुख्यमंत्री तिथे जाऊन आले आहेत’, असं राऊत यांनी सांगितलं.

कोविड काळात अयोध्येत जाता आले नाही. तिथे महाराष्ट्रातील भाविकांसाठीचं भवन निर्माण करण्याचा विचार आणि प्रयत्न सुरू आहे. तिथे अनेक कामे करायची असल्याचेही ते म्हणाले.

‘अयोध्या आणि प्रभु श्रीरामाचा आशीर्वाद नेहमीच आम्हाला मिळाला, कारण आमचे मन साफ आहे. आम्ही जे करतो ते राजकीय फायद्या तोट्यासाठी करत नाही. भावना आणि श्रद्धेतून करतो’, असंही त्यांनी सांगितलं.

आता पोलीस चौकशी करतील, मी बोलणार नाही!

कोर्टाच्या आदेशानुसार किरीट सोमय्या चौकशीला सामोरे गेले असतील. आता हा पोलीस तपासाचा भाग. POW म्हणजे आपला आर्थिक गुन्हे विभाग हा सक्षम आहे आणि माझ्या माहिती प्रमाणे ED किंवा IT पेक्षा आमचे अधिकारी हे अशाप्रकारच्या तपासामध्ये अधिक सक्षम आहेत. त्यामुळे पोलीस तपास करतील. सेव्ह विक्रांत घोटाळा त्यातले पैसे हे कसे जमा झाले, त्या पैशाचे काय झाले, राजभवनात जाणाऱ्या पैशाला कसे पायफुटले, ते कोणाच्या खात्यात गेले किती कोटी गोळा केले पण हा सगळा पोलीस तपासाचा भाग असल्याने मी यापुढे यावर बोलणार नाही.

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य…

भाजपकडून शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्याची भाषा केली जात असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की भाजप काही म्हणू शकेल. त्यांच्या म्हणण्यावर राज्य चाललेला नाही. इथे कायद्याचे राज्य आहे. कायद्यानुसार चालेल.