लांब व मध्यम पल्ल्याच्या 90 एसटी फेऱ्या सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर आज रत्नागिरी विभागामध्ये 964 कर्मचारी कामावर हजर झाले. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत करण्यावर एसटीचा भर असून आजपासून लांब आणि मध्यम पल्ल्याच्या 90 फेऱ्या सुरू झाल्या. आतापर्यंत रत्नागिरी एसटी विभागातून 700 फेऱ्या सुरू आहेत. 22 एप्रिलनंतर एसटी पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे.

एसटी कर्मचारी संपामुळे गेले पाच महिने एसटी वाहतूक बंद होती. संप मागे घेतल्यानंतर आता एसटी बस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. संपात सहभागी कर्मचारी आता कामावर रुजू होऊ लागले आहे. आज सोमवारी 964 कर्मचारी कामावर हजर झाले. त्यामुळे जिल्ह्यातील 9 आगारांतून लांब आणि मध्यम पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत केल्यानंतर शहरी भागातील वाहतूक सुरू होणार आहे.