
पवई येथील एका बारमधून महागडय़ा स्कॉचच्या बाटल्या चोरणाऱ्याला पवई पोलिसांनी अटक केली. शाहरुख खान असे आरोपीचे नाव असून त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. चोरीच्या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पवई परिसरात एका बारजवळ पहाटे आरोपी शाहरुख खान आणि त्याचे दोन साथीदार चोरी करण्यासाठी गेले, तर त्याचे दोन साथीदार हे खाली उभे होते. शाहरुखने स्कॉचच्या दहा बाटल्या चोरून त्याच्या साथीदाराकडे दिल्या. एक बाटली खाली पडल्याने आवाज झाला. हा प्रकार वरच्या मजल्यावर झोपलेल्या बारमधील कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यानंतर कर्मचारी हे खाली गेले असता शाहरुखचे दोन साथीदार हे पळून गेले.
तर पहिल्या मजल्यावर चोरी करत असलेल्या शाहरुखला कर्मचाऱ्याने पकडून याची माहिती पवई पोलिसांना दिली. काहीच वेळात पवई पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी शाहरुखला ताब्यात घेऊन अटक केली.

























































